Ratnagiri News – लादलेली MIDC, जिंदाल कंपनीचे प्रदूषण, बेरोजगारी, संकटात सापडलेली मासेमारी; सामाजिक कार्यकर्त्याने फोडली वाचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाटद जिल्हापरिषद गटात शेतकऱ्यांवर लादण्यात येणारी एमआयडीसी, जिंदाल कंपनीकडून होणारे प्रदूषण, जिंदाल कंपनीला जमिनी देऊनही गावात बेरोजगारी वाढली, जयगड बंदराचा विकास, संकटात सापडलेली मच्छिमारी, बंदारावरील अस्वच्छता, जयगड परिसरात पाण्याचा गंभीर प्रश्न आणि खराब रस्ते या विषयांना सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात चांगलीच फोडणी दिल्याने परिसरात वातावरण तापले आहे.

जनतेला आता मूलभूत गरजांची जाणीव झाली असून निवडणुकीत मशाल पेटवण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीचे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार संज्योत चव्हाण, वाटद पंचायत समिती गणांच्या उमेदवार प्रणाली मालप, कळझोंडी गणांतील उमेदवार दिक्षा हळदणकर यांच्या प्रचारासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर मैदानात उतरले आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. वाटद एमआयडीसीच्या विरोधात जनआंदोलन उभे करून प्रथमेश गावणकर यांनी प्रशासनाची झोप उडवली होती. त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात ते सामाजिक प्रश्नावर प्रकाशझोत टाकत आहेत.

वाटद जिल्हा परिषद गटातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तीनही उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यान त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आंबेडकरी विचाराच्या जनतेने जिल्हा परिषद गटातील उमेदवार संज्योत चव्हाण यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मतदारसंघात त्यांची ताकद वाढली आहे. तीनही महिला उमेदवारांना सरपंचपदाचा अनुभव असल्याने जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे.

मी जयगड मध्ये प्रचाराला आलो तेव्हा इथे रस्त्याच्या बाजूला अशा पाण्याच्या टाक्या दिसल्या. जीवनासाठी आवश्यक पाणीही या ग्रामस्थांना मिळत नाही. देशात स्वच्छता अभियान राबवले पण ते तळागाळात पोहोचले का? हा प्रश्न येथे आल्यावर उपस्थित होतो. येथील मच्छिमार व्यवसाय अडचणीत आहे. जेटी नादुरुस्त आहे, मग याला विकास म्हणायचा का? – प्रथमेश गावणकर, सामाजिक कार्यकर्ते