सावध ऐका, पुढच्या हाका; रत्नागिरीसह नऊ जिह्यांत कोरोना पुन्हा वाढतोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लॉकडाऊन हळूहळू शिथिल केल्यानंतर लोक बिनधास्त झाले. सोशल डिस्टन्सिंग, मास्क यासरख्या साध्या बाबींचे पालनही अनेक ठिकाणी होत नसल्याने कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. मुंबई, ठाण्यासह रत्नागिरी, अमरावती, गडचिरोली, नागपूर या ठिकाणी कोरोना रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेने सतर्पतेचा इशारा दिला आहे. वेळ पडल्यास पुन्हा निर्बंध कडक करण्याची आवश्यकता भासेल असे संकेतही देण्यात आले आहेत.

राज्यात कोरोना लॉकडाऊनची नियमावली हळूहळू शिथिल करण्यात आली आहे. शाळा, कॉलेजस सुरू झाली आहेत, त्याचप्रमाणे लोकल ट्रेन, एसटी, बसेसही सुरू झाल्याने वर्दळ वाढली आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांपेक्षा ग्रामीण भागात लोक अधिक बिनधास्त झाले असल्याची माहिती टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी दिली. यामुळेच या जिह्यांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण अधिक वाढले असल्याचे कारण आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मास्क, सोशल डिस्टन्सिंगसाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या तसेच कोरोना रुग्णांचे ट्रेसिंग, ट्रकिंग आणि टेस्टिंग या तीन गोष्टी अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱयांना देण्यात आल्याचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

कोरोनाबाबत विदर्भ, मराठवाडयातील ग्रामीण भागांत लोक अधिक बेफिकीर झाले आहेत. अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, रत्नागिरी, भंडारा, गडचिरोली, नांदेड या भागांत कोरोना वाढत असल्याने या भागांत विशेष मोहीम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे सातारा, नागपूर, नाशिक, ठाणे, नवी मुंबई भागातही लक्ष देण्यात येत असल्याचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

केंद्राकडून लसिकरणासाठी अधिक वेगाने प्रतिसाद मिळण्याची आवश्यकता

लसिकरणाची मोहीम ही सर्वस्वी केंद्राच्या निर्देशांवर अवलंबून आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सतत केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत. सरकारी रुग्णालयांनंतर आता खासगी रुग्णालयांतील कर्मचार्यांचेही लसीकरण व्हावे तसेच ज्यांचे वय 50 पेक्षा जास्त आहे त्यांचेही लसीकरण करण्यात यावे यासाठी सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अधिकाधिक लोकांना लसीकरण करून त्यांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी केंद्राकडूनही लसीकरणासाठी वेगाने प्रतिसाद मिळण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

निर्बंधांचे संकेत

राज्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त केली आहे. यावर काय बंधने घालता येतील याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत निर्णय घेतील, असे सांगत थोरात यांनी नवे निर्बंध लागू करण्याचे संकेत दिले आहेत. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.