कच्चा माल देतो, पक्का माल बनवून द्या सांगत रत्नागिरीकरांना आणखी एका कंपनीचा गंडा; चारशेहून अधिकजणांची फसवणूक झाल्याची शक्यता

कच्चा माल आम्ही देतो, तुम्ही पक्का माल करून द्या. त्याचे मार्केटींग आम्हीच करु. अशाप्रकारे फसवणूक करून रत्नागिरीकरांना आणखी एका कंपनीने गंडा घातला आहे. रत्नागिरीतील चारशेहून अधिक नागरीकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. कंपनीमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर परतावा न मिळाल्यामुळे एक पिडीत व्यक्ती पुढे आली असून तीने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या कंपनीचे नाव आरजू टेकसोल असे असून आज दुपारी ग्रामीण पोलीसांनी मिरजोळे एमआयडीसी येथील कंपनीच्या गोडावूनवर धाड टाकली.

जून 2021 मध्ये रत्नागिरीत आरजू टेकसोल कंपनी स्थापन करण्यात आली. या कंपनीने 25 हजार रुपये ते 40 लाख रुपयांपर्यंत वेगवेगळ्या डिपॉझिटच्या 15 महिने, 36 महीने आणि 60 महिने या मुदतीच्या स्कीम राजेश प्रभाकर पत्याणे यांना सांगितल्या. पत्याणे यांना खिळे बनवण्याचे ऑटोमॅटीक मशीन, खिळे बनवण्याचा कच्चा माल तसेच पुरवण्यात आलेला कच्चा माल वापरून तयार केलेल्या पक्क्या मालाचा मोबदला देतो असे खोटे आश्वासन दिले. तसेच राजेश पत्याणे यांनी गुंतवणूक केलेल्या 18 लाख रुपयांवर 16 टक्केप्रमाणे 2 लाख 88 हजार रुपये इतकी रक्कम दरमहा परतावा म्हणून देतो. तसेच 15 महिने झाल्यानंतर भरलेली डिपॉझिटची रक्कम परत करतो. तसेच कंपनीमार्फत करार करुन देतो. अशी खोटी आश्वासने देऊन राजेश पत्याणे यांची फसवणूक केली. आपली 18 लाख रुपयांची फसवणूक तसेच अन्य गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार राजेश पत्याणे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात केली असून आरजू टेकसोल कंपनीचे संचालक प्रसाद शशिकांत फडके, रा. गावखडी, संजय विश्वनाथ सावंत, संजय गोविंद केळकर आणि अनि उर्फ अमर महादेव जाधव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण पोलीसांनी मिरजोळे एमआयडीसी येथील आरजू टेकसोल कंपनीवर धाड टाकली आणि कागदपत्रांची तपासणी केली.

आरजू टेकसोल कंपनीवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कच्चा माल देतो सांगून अगरबत्ती बनवा, मेणबत्ती बनवा, मॉप बनवा असे सांगून अनेकांची फसवणूक केली आहे. डिपॉझिट रक्कम देऊन त्यावर व्याज देतो सांगून फसवणूक केली आहे. यामध्ये चारशेहून अधिक लोक फसलेले असून 30 ते 40 कोटी रुपयांची फसवणूक असण्याची शक्यता आहे. – धनंजय कुलकर्णी, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी