
तब्बल नऊ वर्षानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. गेले चार वर्ष “भावी नगरसेवक” म्हणून बिरूदावली लावणाऱ्यांची आता कसोटी लागली आहे. प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचे पडघम उमटू लागले होते. आज (4 ऑक्टोबर 2025) राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीची निवडणुका जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवारांची पळापळ सुरू झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात २०१६ साली नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर कार्यकाल संपल्यानंतरही कोरोना असल्यामुळे निवडणुका स्थगित होत्या. सुरूवातीला नगराध्यक्षपद आरक्षण आणि पाठोपाठ प्रभागनिहाय आरक्षण पडल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी मोर्चबांधणी सुरू केली. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड नगरपरिषदा आणि गुहागर, देवरूख व लांजा नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होत आहे. रत्नागिरी, राजापूर नगरपरिषदेतील आणि लांजा नगरपंचायतीमधील अनेक जण गद्दारी करून शिंदे गटात गेले आहेत. त्यांना धडा शिकवण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिक सज्ज झाला आहे.
गद्दार हद्दपार
२०१६ च्या निवडणूका शिवसेना स्वबळावर लढली होती. रत्नागिरी सारखी महत्वाची नगरपरिषद शिवसेनेने नगराध्यक्षपदासह मोठ्या फरकाने जिंकली होती. २००१ नंतर पहिल्यांदाच २०१६ साली थेट नगराध्यक्ष निवडणूक झाली होती. शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करत रत्नागिरी नगरपरिषदेवर भगवा फडकवला होता. सत्तेच्या लोभापायी दोन माजी नगराध्यक्ष आणि काही नगरसेवक शिंदे गटात गेले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने गद्दारांना हद्दपार करण्यासाठी कंबर कसली आहे. २०१६ साली चिपळूण नगरपरिषदेत भाजपच्या महिला नगराध्यक्षा निवडून आल्या होत्या. चिपळूणमध्ये पुन्हा एकदा भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. खेड नगर परिषदेतही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला नागरिकांचा वाढता पाठींबा आहे. त्यामुळे यंदा खेड नगरपरिषदेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. थोडक्यात हुलकावणी देणारी राजापूर नगरपंचायत यावेळी महाविकास आघाडी काबीज करणार आहे. लांजा नगरपंचायतीत गद्दारांना धडा शिकविण्यासाठी शिवसेना सक्षमपणे मैदानात उतरणार आहे. गुहागर आणि देवरूख नगरपंचायतीवर भगवा फडकवण्याचे स्वप्न यंदा सत्यात उतरणार आहे.




























































