रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाई, 28 हजार 173 ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई सुरु झाली आहे. जिल्ह्यातील 30 गावातील 99 वाड्यांमध्ये 7 टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. या 30 गावातील 28 हजार 173 ग्रामस्थांना पाणी टंचाई भेडसावत आहे.

उन्हाळा सुरु होताच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. विहिरी आणि जलस्त्रोत आटल्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणी टंचाईग्रस्त गावांना जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग टँकरने पाणी पुरवठा करतो. सध्या 30 गावातील 99 गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. त्यामध्ये मंडणगड तालुक्यातील एका गावातील एका वाडीतील 158 ग्रामस्थांना एका खासगी टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. दापोली तालुक्यातील 2 गावातील 2 वाड्यांमध्ये 888 ग्रामस्थांना एका शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.

खेड तालुक्यातील 6 गावातील 21 वाड्यांमधील 3 हजार 511 ग्रामस्थांना एका शासकीय टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. हा शासकीय टँकर 26 फेऱ्या मारत आहे. चिपळूण तालुक्यातील 13 गावातील 29 वाड्यामधील 9 हजार 547 ग्रामस्थांना एका खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. हा टँकर 16 फेऱ्या मारत आहे. संगमेश्वर तालुक्यामधील एका गावातील 4 वाड्यामध्ये राहणाऱ्या 384 ग्रामस्थांना एका शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.

रत्नागिरी तालुक्यामधील 4 गावातील 37 वाड्यांमध्ये राहणाऱ्या 13 हजार 245 ग्रामस्थांना एका खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. हा टँकर 126 फेऱ्या मारत आहे. लांजा तालुक्यातील 3 गावातील 5 वाड्यांमध्ये राहणाऱ्या 440 ग्रामस्थांना एका शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. राजापूर आणि गुहागर तालुक्यात अद्याप पाणीटंचाई सुरू झालेली नाही.