रत्नागिरी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे कामाचा खेळखंडोबा, 2 हजार 673 पदे रिक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी रिक्त पदांची संख्या प्रचंड वाढली आहे. 8 रिक्त पदांमुळे एकाच कर्मचाऱ्यावर दोनतीन विभागांचा पदभार पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या कामाचा खेळखंडोबा होत आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये मंजूर 11 हजार 266 पदांपैकी आतापर्यंत फक्त 8 हजार 593 पदे भरलेली आहेत. तब्बल 2 हजार 673 पदे रिक्त आहेत.

गेली अनेक वर्षे भरती प्रक्रीया न राबवल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे वाढली आहेत. क प्रवर्गात सरळसेवेतील 9 हजार 483 पदे आणि पदोन्नतीची 1 हजार 026 पदे अशी एकूण 10 हजार 509 पदे मंजूर आहेत. त्यापैकी सरळसेवेतील 7 हजार 462 पदे भरण्यात आली आहे. पदोन्नतीमधील 745 पदे भरण्यात आली आहेत. एकूण 10 हजार 509 पैकी 8 हजार 207 पदे भरण्यात आली आहेत. सरळसेवेतील तब्बल 2 हजार 021 पदे रिक्त आहेत. आणि पदोन्नतीची 281 पदे रिक्त आहेत. अशी एकूण क प्रवर्गातील 2 हजार 302 पदे रिक्त आहेत. ड प्रवर्गातील सरळसेवेची 679 पदे पदोन्नतीची 78 पदे अशी एकूण 757 पदे मंजूर आहेत. त्यापैकी सरळसेवेची 334 पदे भरली आहेत. तर पदोन्नतीची 52 पदे भरली आहेत. एकूण 757 पैकी 386 पदे भरलेली आहेत. सरळसेवेची 345 पदे आणि पदोन्नतीची 26 पदे रिक्त आहेत. ड प्रवर्गातील एकूण 757 पैकी 371 पदे रिक्त आहेत. क आणि ड प्रवर्गाचा एकत्रीत विचार केला असता एकूण सरळसेवेतील 10 हजार 162 पदे आणि पदोन्नतीची 1 हजार 104 पदे अशी एकूण 11 हजार 266 पदे मंजूर आहेत. त्यापैकी सरळसेवेने 7 हजार 796 पदे भरली आहेत. पदोन्नतीची 797 पदे भरली आहेत. अशी एकूण 8 हजार 593 पदे भरण्यात आली आहेत. सरळसेवेची 2 हजार 366 पदे रिक्त आहेत. पदोन्नतीची 307 पदे रिक्त आहेत. एकूण 11 हजार 266 पदांपैकी 2 हजार 673 पदे रिक्त आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेत सुमारे 23 टक्के पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे एकाच कर्मचाऱ्यावर दोनतीन विभागांचा पदभार पडत आहे. त्यामुळे नागरीकांच्या कामाचा खेळखंडोबा होत आहे. ही रिक्त पदे त्वरीत भरा अशी कर्मचाऱ्यांची गेली अनेक वर्षे मागणी आहे. जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांचीही अनेक पदे रिक्त आहेत.