
रत्नागिरीत सलग तिसऱ्या दिवशी वळीवाच्या पावसाने धूमाकूळ घातला. मे महिन्यातच सुरू झालेला धुवांधार यावसाने जनजीवन विस्कळीत झाले.हवामान खात्याने 23 मे रोजी रेड अलर्ट आणि 24 व 25 मे या कालावधीत ऑरेंज अलर्ट दिला आहे.
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात 23 मे 2025 या कालावधीत रेड अलर्ट व 24 व 25 मे या कालावधीत ऑरेंज अर्लट देण्यात आलेला आहे. 22 व 23 मे 2025 या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळीवाऱ्यासह (ताशी 50 ते 60 किमी प्रती तास) मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. 24 मे व 25 मे रोजी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंडणगड तालुक्यात मनसुर अहमद पोशीलकर यांच्या घरावर वीज कोसळून लागलेल्या आगीत घराचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात कोळंबे येथे विनायक गुळेकर यांच्या घरावर वीज पडून लाईट फिटींगचे नुकसान झाले आहे. शिरगाव येथे शिवराज विजय शेट्ये यांच्या घराच्या पडवीवर झाड पडून 10 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कोळीसरे येथे जगन्नाथ महादेव शिंदे यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. मिरजोळे येथे दयानंद लिलाधर जाधव यांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. मिरजोळे येथे प्रकाश तुकाराम जाधव यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे.
हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in// या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02352) 222233 / 226248 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.
वीज चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी. वीज चमकत असताना विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा. वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. वीज चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. वीज चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी ॲप’ डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 391 मिमि पाऊस पडला.
मंडणगड-15.50 मिमी
खेड- 43.14मिमी
दापोली- 18.42 मिमी
चिपळून – 27.11 मिमी
गुहागर- 42.20 मिमी
संगमेश्वर – 82.33 मिमी
रत्नागिरी – 63.44 मिमी
लांजा – 54.60 मिमी
राजापूर- 44.37 मि मि