
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवडी येथे भरधाव गाडी चालवून सहा जणांना चिरडले. या अपघातात दर्शन पाटील (14) व कल्पेश घारसे (24) या दोघांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या शिवडी, लालबाग परिसरातील तरुणांनी केईएम रुग्णालय परिसरात राडा केला. बेदरकार गाडी चालवणार्या शाहबाजला जाब विचारण्यासाठी या तरुणांनी थेट रुग्णालयातच घुसण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलीस तसेच सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करीत या 100 ते 150 तरुणांच्या घोळक्याला रुग्णालयाबाहेर पाठवले.
शिवडी येथील अपघातात गंभीर जखमी असलेल्या कल्पेश घारसे याचा केईएम रुग्णालयात सोमवारी पहाटे मृत्यू झाला. यामुळे आधीच संतप्त झालेल्या कल्पेश तसेच त्याच्या निकटवर्तीयांनी रुग्णालयाजवळ जमण्यास सुरुवात केली. शाहबाज बारी तसेच त्याच्या पत्नीला केईएममधील अपघाती विभागाच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. हे समजताच या जमावाने शाहबाज विरोधात सदोष मनुष्यवधाचा अजामानीपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शाहबाज ज्या वॉर्डात होता त्या दिशेने जाण्याचा हा जमाव प्रयत्न करू लागला. दरम्यान पोलिसांची जादा कुमक केईएम रुग्णालयात मागविण्यात आली. आपत्कालीन विभागाचे प्रवेशद्वार बंद करून या तरुणांना केईएमच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतांचे नातेवाईक तसेच तरुणांनी किडवाई पोलीस ठाणे गाठले. सायंकाळी पाच वाजता कल्पेशचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दर्शन याच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान शाहबाज तसेच जयेश मांडवकर या दोघांना डोक्याला मार लागला आहे. जय मांडवकर याची प्रकृती गंभीर आहे. तर स्वाती पाटील, निधी पाटील, गौरी मांडवकर यांची प्रकृती स्थिर असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी सांगितले.
घारसे, पाटील कुटुंबीयांवर शोककळा
कल्पेश घारसे तसेच दर्शन पाटील हे दोघेही कुटुंबातील एकुलते एक मुलगे होते. शिवडी येथील कृष्णा को-ऑप सोसायटीत राहणार्या कल्पेशच्या लहानपणीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. नुकताच कल्पेश कामाला जाऊ लागला होता. आईचा एकमेव आधार असलेला कल्पेश गेला. तर घाटकोपर येथे राहणारा दर्शन हा नुकताच बारावी पास झाला होता. मांडवकर, पाटील हे कुटुंबीय कल्पेशच्या घरी रविवार सुट्टीचा दिवस असल्याने एकत्र जमले होते. घरी काही क्षण आनंदात घालविल्यानंतर निरोप देऊन अपापल्या घरी जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या नातेवाईकांवर काळाने घाला घातला, अशी प्रतिक्रिया सुदेश पारधी यांनी दिली.
टॅक्सीचालकांचा मुजोरपणाही ठरला अपघाताला कारण
कल्पेश आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी ज्यावेळी शिवडी पोस्ट ऑफिससमोर टॅक्सी बघत होता त्यावेळी टॅक्सीचालकांनी भाडे स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना रस्ता ओलांडून पलीकडच्या बाजूला जावे लागले. पलीकडच्या दिशेने टॅक्सी शोधत असतानाच हा अपघात घडला. या मुजोर टॅक्सीचालकांविरोधातही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी कल्पेशचा आतेभाऊ सुदेश पारधी यांनी केली.
शाहबाजची नंबर प्लेटही फॅन्सी
शाहबाज हा माझगाव येथील रहिवासी आहे. जी इरटिगा गाडी तो चालवत होता त्याची नंबर प्लेटही फॅन्सी ठेवण्यात आली होती. ‘बाज’ असे इंग्रजी अक्षर यावर असल्याने गाडीचा नंबर नेमका कोणता हे ओळखणेही कठीण होते.
शाहबाजच्या पत्नीला मारहाण
सहा जणांना उडवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्या शाहबाजविरोधात मृतांच्या जवळच्या व्यक्तींचा राग अनावर झाला आणि थेट शाहबाजच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना दुपारी भोईवाडा कोर्टाजवळ घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
























































