बीसीसीआयने भाजप-आरएसएससमोर गुडघे टेकले का? रवींद्र जडेजाच्या ट्विटमुळे नेटकऱ्यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल पत्नीला असणाऱ्या ज्ञानाची प्रशंसा केल्याने हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा ट्रोल झाला आहे. पत्नी रिवाबा जडेजाचे कौतुक करणारे ट्विट पाहून आता नेटकऱ्यांनी थेट बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.

नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत रिवाबा जडेजा जामनगर उत्तर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आली आहे. रिवाबाच्या प्रचारापासून जडेजा सातत वादात सापडत आहे. हिंदुस्थानी क्रिकेट संघाची जर्सी घालून प्रचार रॅलीत भाग घेतल्याने जडेजावर टीका झाली होती. आता पुन्हा एकदा तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

जडेजाने रिवाबाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यानंतर त्याने राष्ट्रीय ध्वजासह ‘इंडियन’ असे कॅप्शन दिलेला स्वतःचाही एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. 26 डिसेंबर रोजी जडेजाने पत्नी रिवाबाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. “आरएसएसबद्दल तुझं ज्ञान पाहून खूप छान वाटलं. आरएसएस ही हिंदुस्थानी संस्कृती आणि आपल्या समाजाच्या मूल्यांचे पालन करण्याच्या आदर्शांना प्रोत्साहन देणारी संस्था आहे. तुझं ज्ञान आणि कठोर परिश्रम तुला इतरांपेक्षा वेगळं बनवतात. अशीच प्रगती सुरू ठेव,” असं कॅप्शन देत जडेजाने व्हिडिओ शेअर केला आहे.

रिवाबा एका कार्यक्रमामध्ये आरएसएसचे कौतुक करताना म्हणाली की, देशभक्ती, राष्ट्रवाद, त्याग आणि एकात्मता या सगळ्या मूल्यांना धरून चालणारी संघटना आणि भाजपची मातृ संघटना म्हणजे आरएसएस. हाच व्हिडिओ रवींद्र जडेजानं शेअर केला आहे. मात्र नेटकऱ्यांनी या व्हिडिओवरून जडेजाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. “तू राजकारणात प्रवेश केला आहेस की बीसीसीआयनं भाजप आणि आरएसएससमोर गुडघे टेकले आहेत? असा प्रश्न त्याला विचारण्यात येत आहे.

याबद्दल काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत सांगितलं की, ईडी आणि आयकर विभागाच्या भीतीमुळे खेळाडू, अभिनेते असे अनेकजण भाजपला खूश ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच हा परिणाम आहे.