आणखी एका बँकेवर संकट; आरबीआयचे ‘या’ बँकेवर निर्बंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिझर्व्ह बँकेने मंगळवारी तामिळनाडूच्या लक्ष्मी विलास या खासगी बँकेवर निर्बंध लादल्यानंतर महाराष्ट्रातील आणखी एक बँकेवर निर्बंध लादले आहेत. महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील मंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवर पुढील सहा महिन्यांपर्यंत पैशांचे व्यवहार आणि कर्ज देण्यावर निर्बंध घातले आहेत.

मंठा अर्बन बँकेला काही निर्देश देण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. 17 नोव्हेंबरपासून पुढील सहा महिन्यांपर्यंत हे निर्बंध राहणार आहेत. आरबीआयच्या परवानगीशिवाय बँक कोणतेही कर्ज किंवा उधार देऊ शकणार नाही. तसेच जुन्या कर्जाचे नुतनीकरण करणे किंवा कोणतिही गुंतवणूक बँकेला करता येणार नाही. त्याचप्रमाणे बँकेला खातेदारांकडून नव्याने पैसे घेण्यास किंवा पैशांचे वितरण करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

आरबीआयने तामिळनाडूच्या लक्ष्मी विलास बँकेवरही महिन्याभरासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. खातेदारांसाठी पैसे काढण्याची मर्यादा 25 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. सरकारने आयबीआयच्या निर्देशांनुसार बँकेवर हे निर्बंध घातले आहेत. निर्बंध घालण्यात आलेल्या बँका आर्थिक संकटात असून सध्या योग्य गुंतवणूकदारांच्या प्रतीक्षेत आहेत.

बँकेची आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने हे निर्बंध लादले आहेत. याआधीही रिझर्व्ह बँकेने संकटात आलेल्या यस बँकेवर निर्बंध लादले होते. त्यानंतर लक्ष्मी विलास बँक आणि आता मंठा बँकेवर निर्बंध लादण्यात आले आहेत. बँकेवर घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे खातेदार चिंतेत असून आपले पैसे परत कधी मिळणार असा प्रश्न त्यांना पडला आहे.