व्याजदर जैसे थे; महागाई वाढणार, आर्थिक स्थिती बिकट !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

रिझर्व्ह बँकेने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट दरात कुठल्याही प्रकारचा बदल केला नाही. आज रिझर्व्ह बँकेच्या वतीने चौथ्या पतधोरण आढाव्याची बैठक झाली. या बैठकीत व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडणार असल्याने महागाईचा आगडोंब उसळेल तसेच देशाची आर्थिक स्थितीही बिकट होईल, असा इशाराही रिझर्व्ह बँकेने दिला आहे. त्यामुळे एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर  कमी करणाऱ्या सरकारची दुसरीकडे मात्र अग्निपरीक्षा असणार आहे.

व्याजदर जैसे थे ठेवल्यामुळे रेपो रेट 6.50 टक्के तर रिव्हर्स रेपो रेट  6.25 टक्के राहणार आहे. तर महागाईचा दर 4 टक्के आणि 2019 मध्ये आर्थिक विकासाचा दर 7.4 टक्के राहील असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, रेपो रेट दरात कमीत कमी 0.25 टक्क्यांची वाढ होईल असा अंदाज अर्थतज्ञांनी व्यक्त केला होता. रुपयाच्या सततच्या घसरणीमुळे रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढण्याची शक्यताही अर्थतज्ञांनी व्यक्त केली होती.

म्हणून उसळणार महागाईचा आगडोंब
महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवते. यंदा व्याजदर जैसे थे ठेवल्यामुळे महागाईचा आगडोंब उसळेल असा इशारा रिझर्व्ह बँकेने दिला आहे. महागाईचा दर चार टक्क्यांहून अधिक राहिला तर आरबीआय व्याजदरात वाढ करते, मात्र यंदा महागाईचा दर 4.2 टक्के राहिला तरीही आरबीआयने व्याजदरात वाढ केलेली नाही. त्यामुळे हिंदुस्थानची आर्थिक स्थिती बिकट होऊन महागाई वाढेल असा इशारा आरबीआयने दिलेला आहे.

बैठकीत एका सदस्याचा व्याजदर जैसे थे ठेवण्याला विरोध
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीत सर्व सदस्यांनी व्याजदर जैसे थे ठेवण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला, परंतु चेतन घटे यांनी मात्र व्याजदरात 0.25 टक्के वाढ करण्याच्या बाजूने मत नोंदवले.

आरबीआयच्या घोषणेनंतर रुपया आपटला
आरबीआयच्या घोषणेनंतर लगेचच रुपया डॉलरच्या तुलनेत 74 पेक्षाही खाली आला. रुपया पहिल्यांदाच इतक्या नीचांकी पातळीवर घसरला. आरबीआयचे रुपयाची घसरण रोखण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. रुपया घसरल्यामुळे वस्तूंची आयात महागणार असून महागाई पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून रुपयाचे घरंगळणे सातत्याने सुरूच आहे. शुक्रवारी चलनबाजारात रुपयाची घसरण सात पैसे कमी दराने सुरू झाली.