
ठोस महागाई आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीची गरज लक्षात घेत रिझर्व्ह बँकेकडून आगामी मौद्रिक नीती समीक्षा बैठकीत रेपो रेटबाबत नरमाईचे धोरण अवलंबण्यात येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. व्याजदरांमध्ये 3 वेळा 0.50 टक्क्यांची वाढ केल्यानंतर आता आरबीआय यंदा व्याजदरात 0.25 ते 0.35 टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
मौद्रिक नीती समितीची (Monetary Policy Committee) बैठक 5 डिसेंबरपासून सुरू होत आहे. तीन दिवसांच्या या बैठकीनंतर 7 डिसेंबरला धोरण जाहीर करण्यात येणार आहे. डोमेस्टिक फॅक्टरसह अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अनुसरण करण्यात येते. त्यात या महिन्याच्या अखोरीस रेपो रेटमध्ये किरकोळ वाढ करण्याचे संकेत मिळाले आहेत. रिझर्व्ह बँकेने या वर्षात मे महिन्यापासून रेपोरेटमध्ये 1.90 टक्क्यांनी वाढ केली आहे. तरीही 6 टक्क्यांच्या समाधानकारक स्तराच्या वरच महागाई कायम आहे.
यंदाही रेपोरेटमध्ये वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. मात्र, ही वाढ किरकोळ 0.25 ते 0.35 टक्के असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसेच या आर्थिक वर्षात रेपो रेट 6.5 टक्क्यापर्यंत पोहचण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा रेपोरेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच महागाई देखील काही प्रमाणात कमी होण्याचे संकेत आहेत. मात्र, महागाई संतोषजनक स्तराच्या वरच असेल असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.



























































