रेसिपी : राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड

2577

pratik-poyrekar-chefआपल्याकडे राजगिरा हा फक्त उपवासासाठी वापरला जातो. मात्र या राजगिऱ्याच्या आपण दैनंदिन जेवणात देखील वापर करू शकतो. राजगिऱ्याचे पौष्टिक सलाड देखील करता येऊ शकते. हे सलाड अत्यंत पौष्टिक असून त्यात डाएट करणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे. आज शेफ प्रतीक पोयरेकर यांनी सामनाच्या वाचकांसाठी राजगिऱ्याचे पौष्टिक सलाडची रेसिपी दिली आहे.

साहीत्य :

1 वाटी राजगिरा, 1 छोटी वाटी बीट (छोट्या चौकोनी आकारात कापलेले), 1 छोटी वाटी गाजर (छोट्या चौकोनी आकारात कापलेले) , दहा ते बारा मनुका, एक वाटी ब्रोकोली, अर्धी वाटी बारीक चिरलेली सेलरी, एक लहान वाटी बारीक चिरलेला कांदा, पाच ते सात अक्रोड बारिक चिरून, छोटी वाटी बारीक चिरलेली पार्सली, लहान चमचा तेल, एक लहान चमचा, लिंबाचा रस, एक लहान चमचा मध, चवीपुरते मीठ,चवीपुरता कुटलेली काळी मिरी,

कृती : 

– प्रथम राजगिरा व्य़वस्थित उकडुन घ्या. राजगिरा उकडण्यासाठी त्याच्या दुप्पट पाणी घ्या व ते उकळा. 15 मिनिटं राजगिरा शिजू द्या. त्यानंतर राजगिरा गाळणीच्या साहाय्याने गाळून एका भांडयात काढुन घ्या.

– नंतर सर्व भाज्या हलक्या उकळुन घ्या. त्या पूर्ण शिजविण्याची गरज नाही. जास्त शिजवल्याने भाज्यांमधील पौष्टिक जीवनसत्वे नष्ट होतात. भाज्या शिजवताना थोडे मीठ टाका

– वाडग्यात शिजवलेला राजगिरा, अक्रोड, मनुका आणि सर्व भाज्या एकत्र करा.

– त्यात थोडं तेल, लिंबाचा रस, मध आणि चवीपुरते मीठ टाकुन मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. तुमचं सलाड तयार आहे.

ड्रेसिंगसाठी (ऑप्शनल)

– एका भांडयात पाणी उकळत ठेवा. गॅस मंद आचेवर ठेवा.
एक अंडे फोडून ते एका लहान भांडयात काढ़ा. ते अंडे त्या मंद
आचेवरील पाण्यात अलगद सोडा. 2-3 मिनिटांनी अंड बाहेर काढ़ा. सलाडसोबत सर्व्ह करा.

आपली प्रतिक्रिया द्या