पश्चिम रेल्वेची तिकीट तपासणी मोहिमेतून 79.48 कोटींची वसूली; मुंबई विभागाची सर्वोत्तम कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वे नियमित तिकीट तपासणी मोहीम राबवत आहे. पश्चिम रेल्वेने तिकीट तपासणी मोहिमेतून 79.48 कोटींचा दंड वसूल करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत झालेल्या तपासणी मोहिमेदरम्यान विनातिकीट प्रवासाची 12.57 लाख घटना आढळल्या असून त्यातून 79.48 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. विभागाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम तिकीट तपासणी कामगिरी आहे. एसी लोकलमध्येही विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकातून याबाबतची माहिती दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने तिकीट तपासणी मोहिमेत इतिहास रचत विक्रमी दंडवसूली केली आहे. 2022-23 मध्ये झालेल्या तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान एकून 79.48 कोटी दंड वसूल झाला आहे. 2022-2023 साठी 74.73 कोटी रुपये निर्धारित केलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त आहे. दंडाच्या रकमेत 6.35 टक्क्यांची वाढ झाली आहे.

मुंबई विभागातील तिकीट तपासणी कर्मचार्‍यांच्या कामगिरीबद्दल 31 कर्मचार्‍यांना गुणवत्ता प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यात लक्ष्मण कुमार, सुरत येथील मुख्य तिकीट निरीक्षक यांनी 13,088 प्रकरणे शोधून काढत महत्त्वाची कामगिरी केली आहे. योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या आणि बुक न केलेले सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांकडून दंड म्हणून 92.47 लाख रुपये वसूल केले आहेत. इतर गुणवंत कर्मचाऱ्यांमध्ये अमरेश पासवान, सुरत येथील मुख्य तिकीट निरीक्षकांनी 11,001 प्रकरणे शोधून काढली आणि सुमारे 88.73 लाख दंड वसूल केला. एल.एस.तिवारी, बोरिवली येथील मुख्य तिकीट निरीक्षक यांनी 10,072 प्रकरणे शोधून काढली आणि 70.35 लाख रुपयांचा दंड वसूल केला. सर्व कर्मचार्‍यांची कामगिरी उल्लेखनीय आहे आणि तिकीट तपासणीची ही उत्कृष्ट कामगिरी साध्य करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

एसी लोकल ट्रेनमध्ये अचानक तिकीट-तपासणी मोहीम राबविण्यात आली. विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक (मुंबई विभाग) 15 एप्रिल चर्चगेट आणि विरार दरम्यान चार वेगवेगळ्या एसी लोकल सेवांमध्ये अचानक तपासणी करण्यात आली. विना तिकीट प्रवासाची 61 प्रकरणे आणि अतिरिक्त प्रवासाची 21 प्रकरणे टीमने शोधून काढली आणि प्रवाशांकडून 32,425 दंड वसूल करण्यात आला. 17 एप्रिल 2023 पर्यंत एसी लोकलमधील विनातिकाट प्रवासाची 3300 हून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत.

पश्चिम रेल्वेने सर्वसामान्यांना मॅन्युअल तिकीट काउंटरद्वारे आणि यूटीएस अॅप, एटीव्हीएम मशीन इत्यादीद्वारे डिजिटल ऑनलाइन तिकिटांमधून योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.