पाकिस्तानमधून उडत आहेत लाल दिवे! सीमेवरील गावांत घबराट, जवानांची शोधमोहीम

667

हिंदुस्थानी हद्दीत पाकिस्तानने सोमवारी ड्रोन घुसवल्याची घटना उघड झाली होती. फिरोजपूर जिह्याच्या तीन गावांमध्ये ड्रोन उडताना दिसल्याने घबराट पसरली होती. त्यानंतर बुधवारी रात्री पुन्हा एकदा सीमेजवळील भागात चमकणारे लाल दिवे दिसले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले. अख्खी रात्र नागरिकांनी जागून काढली. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. लाल दिव्याचे  गौडबंगाल काय आहे याचा तपास सुरू आहे.

सीमेवरील हजारा सिंह, चांदीवाला, टेंडीवाला या गावांतील लोकांनी  बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास लाल रंगाचे दिवे दिसल्याचे सांगितले. रात्र होताच लाल दिवे हिंदुस्थानच्या हद्दीत शिरले. त्यानंतर आकाशात घिरटय़ा घालून पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने झेपावले. हे बघून लोकांनी घाबरून पोलीस ठाणे गाठले. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपास सुरू केला. फिरोजपूरमध्ये दिसलेल्या ड्रोनप्रकरणी पोलीस अधीक्षक गुरमित सिंह चिमा, अजयराज सिंह तपास करीत आहेत. सीमा सुरक्षा दलाचे अधिकारीही गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करीत आहेत. जवानांनी पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. जवानांनी प्रत्येक शेतात जाऊन तपास केला.

आपली प्रतिक्रिया द्या