77 गावपाड्यांत लाल पाणी; अलिबागकरांचे आरोग्य धोक्यात, उमटे धरणातील जलशुद्धीकरण प्लाण्ट कुचकामी

अलिबाग तालुक्यातील 77 गाव-पाड्यांना सध्या लालेलाल पाणी प्यावे लागत आहे. या सर्व गावांना उमटे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र कोट्यवधींचा चुराडा करूनही येथील जलशुद्धीकरण प्लाण्ट नावालाच राहिला असल्याने घराघरात मातीमिश्रित गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही जीवन प्राधिकरण कानाडोळा करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

आलिबाग तालुक्यातील उमटे धरण १९८४ साली बांधले आहे. या उमटे धरणातून अलिबाग तालुक्यातील ४४ गावे व ३३ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. उमटे धरणातून येणारे पाणी हे मातीमिश्रित असल्याने पाणी भरण्याची भांडी पाण्याने भरल्यानंतर भांड्याच्या तळाशी मातीचा थर साचलेला दिसतो. त्यामुळे असेच मातीमिश्रित पाणी येथील नागरिकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे उमटे धरणावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना पिण्यायोग्य व शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या वतीने अॅड. राकेश पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

उमटे धरणाची निर्मिती १९८४ साली करण्यात आली. धरणाची साठवण क्षमता ८७दशलक्ष घनफूट आहे. पाण्याची शेवटची पातळी ४० मीटर, धरणाची उंची ५६.४० मीटर आहे. धरणाच्या पाण्यावर ४४ गावे व ३३ आदिवासी वाड्या अवलंबून आहेत. उमटे धरणाला तब्बल ४१ वर्षे झाली असल्याने धरणाची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

उमटे धरणाच्या पायथ्याशी कोटी रुपये खर्च करून जल पावसाळ्यात दरवर्षी गढूळ पाणी येते. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे याबाबत विचारणा केल्यावर ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे बोट दाखवतात म्हणून आम्ही उमटे धरणाच्या मुख्य मालकांनाच शुद्ध पाणी मिळण्यासाठी अर्ज दिला आहे
– अॅड. राकेश पाटील, उमटे धरण संघर्ष ग्रुप, रायगड