
>> दीपक साळवी
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा रिजनल प्लॅन तयार झालेला नाही. हा रिजनल प्लॅन झाला तर ग्रामीण भागातील घरबांधणीचा दर्जा उंचावेल. रत्नागिरीत घरबांधणीचा व्यवसाय संथगतीने सुरू आहे. कारण आजूबाजूला ज्या गोष्टी घडायला हव्यात त्या घडत नाहीत. परिसरात उद्योग-व्यवसाय यायला हवेत. उद्योग-व्यवसाय वाढल्यास घरांची मागणी वाढेल. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांचा रिजनल प्लॅन तयार झालेला नाही. हा रिजनल प्लॅन झाला तर ग्रामीण भागातील घरबांधणीचा दर्जा उंचावेल, असे मत रत्नागिरीतील विकासक दीपक साळवी व्यक्त करतात.
रत्नागिरीमध्ये सध्या वन बीएचके आणि टू बीएचके घरांना अधिक मागणी आहे. त्यामध्ये 67 टक्के नागरिक वन बीएचके खरेदी करतात. थ्री बीएचकेसाठी फार मोठी मागणी नाही. सध्या रत्नागिरीचा घरबांधणी व्यवसाय पुणे, मुंबईतील लोकांवर अवलंबून आहे. रत्नागिरीतून मुंबईत स्थायिक झालेली मंडळींचा रत्नागिरीत फ्लॅट खरेदी करण्यावर भर आहे. त्याचबरोबर शासकीय नोकरीच्या निमित्ताने रत्नागिरीतील कर्मचारीवर्ग रत्नागिरीत फ्लॅट खरेदी करताना दिसून येतो. रत्नागिरीत घर घेताना चिऱयाच्या बांधकामाची अधिक मागणी आहे.
सिमेंट ब्लॉक वापरणं हे बांधकाम व्यावसायिकांना परवडते. कारण सिमेंट ब्लॉक हलके असल्यामुळे स्टीलवरचा खर्च कमी येतो. मात्र लोकांची मानसिकता लाल चिऱयाचे घर बांधण्याकडे असल्यामुळे रत्नागिरीत लाल चिऱयाचाच वापर केला जातो. रत्नागिरी जिह्यात सध्या 24 मीटर उंचीपर्यंत बांधकामाला परवानगी आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत उंच इमारती उभ्या राहताना दिसत आहेत. अलीकडच्या काळात बांधकामाची किंमत भरमसाट वाढल्याने आणि त्यात स्टील महाग झाल्याने घराच्या किमती वाढल्या आहेत. त्यात रेडी रेकनरच्या बदललेल्या दराची भर पडली आहे. रत्नागिरी शहरातील बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस येण्यासाठी रत्नागिरी शहराची हद्द वाढवणे गरजेचे आहे. हद्दवाढ झाल्यास नगर परिषदेच्या सोयीसुविधा त्या परिसरात पोहोचू शकतात. त्याचबरोबर स्टरलाईटच्या जागेवर कोणीतरी पुढाकार घेऊन आयटी पार्क किंवा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणावी, जेणेकरून रत्नागिरीच्या विकासात भर पडेल आणि त्याचा फायदा बांधकाम व्यवसायाला मिळेल अशी अपेक्षाही विकासक दीपक साळवी व्यक्त करतात.

























































