
पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होत असून यासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीत ‘आप’ने भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेस पक्षानेही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करणार असल्याचं सांगितलं आहे. लवकरच या पदासाठीचा उमेदवार घोषित केला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुनील जाखड यांचंही नाव होतं. मात्र आता ते या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आहेत. आपण हिंदू असल्याने आपण या शर्यतीतून बाहेर फेकलो गेल्याची भावना जाखड यांनी व्यक्त केली आहे.
इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जाखड यांनी त्यांचं दु:ख बोलून दाखवलं. जाखड यांनी यावेळी स्वपक्षीयांबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. ‘दिल्लीतील सल्लागार नीट सल्ले देत नाहीयेत. आमदार नसल्याने, मला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनवला नसतं तर ठीक होतं, मात्र मी पंजाबी हिंदू असल्याने असं करणं बरोबर नाही. यामुळे तुम्ही सगळ्या समुदायावर आघात केला आहे’ असं जाखड यांनी म्हटलं आहे. जाखड यांनी पुढे म्हटले की एका दलित चेहऱ्याला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनविणे योग्य असेल तर त्यांनाच सातत्याने पाठिंबा दिला पाहिजे. पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल हे पक्षाने लवकरात लवकर ठरविले पाहिजे असंही ते म्हणाले. गुरुवारी काँग्रेस पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करेल असं सांगितलं जात होतं, मात्र आज काँग्रेस याबाबतची घोषणा करणार नसल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लाईव्ह हिंदुस्थान या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीत म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी एका व्हर्च्युअल सभेमध्ये काँग्रेस लवकरच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करेल असं जाहीर केलं होतं. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर या पदाच्या उमेदवाराचं नाव घोषित केलं जाईल असं ते म्हणाले होते. या पदासाठी सध्याचे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवजोतसिंग सिद्धू यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. चन्नी आणि सिद्धू हे दोघेही आपल्यात कोणताही वाद नसल्याचे म्हणत असले तरी दोघांतील वाद दिवसेंदिवस टोकाला जात असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे.





























































