रेखा जरे यांची हत्या सुपारी देऊनच, पोलिसांकडून तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘यशस्विनी महिला ब्रिगेड’च्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, पारनेर न्यायालयाने त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, आरोपींना अटक केल्यानंतर या घटनेचा तपास अधिक वेगाने सुरू झाला असून, अजून अन्य नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. सुपारी देऊनच ही हत्या झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

आरोपींमध्ये फिरोज शेख (रा. श्रीरामपूर), शनैश्वर शिंदे (रा. कोल्हार), आदित्य चोळके (रा. राहुरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

रेखा जरे या आई सिंधूताई वायकर, त्यांचा मुलगा, तसेच महिला व बालकल्याण विकास प्रकल्प अधिकारी विजयामाला माने यांच्यासोबत पुण्याहून त्यांच्या सॅण्ट्रो कारमधून नगरला येत होत्या.

नगर-पुणे महामार्गावरील सुपा गावानजीकच्या जातेगाव घाटात दुचाकीवरील दोघांनी पाठलाग करून त्यांची गाडी अडविली. ‘आम्हाला कट का मारला?’ असे म्हणत त्यांनी जरे यांच्यासोबत वाद घालत त्यांच्या गळ्यावर तलवारीने वार करून पळ काढला. यात त्यांचा मृत्यू झाला होता. यासाठी सोमवारी रात्रीच पोलिसांची सहा पथके तपासासाठी रवाना करण्यात आली होती.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरून पोलिसांनी मारेकऱयांचा श्रीरामपूर व राहता परिसरात शोध घेतला. अटक केलेले दोघे कोल्हार येथील असून, ते कोल्हार परिसरातच लपून बसले होते, तर एक आरोपी कोल्हापूरच्या दिशेने फरार झाला होता.

पोलिसांच्या पथकांनी कोल्हार येथून दोघांना, तर कोल्हापूर येथून एकाला अटक केली. तिघांनाही बुधवारी दुपारी पारनेर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील मनीषा डुबे यांनी आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने तीन आरोपींना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

आरोपींचे फोन रेकॉर्डपोलिसांच्या हाती

सुपारी देऊनच ही हत्या घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तपासात आरोपींकडून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

या घटनेसंदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. आरोपींचे फोन रेकॉर्डही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

जरे हत्याकांडात आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांना आज पारनेर न्यायालयामध्ये हजर केले असून, त्यांना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. – अजित पाटील, पोलीस उपअधीक्षक.