रेल्वेकडे बाळ बोठेच्या रहिवासाचे फुटेजच नाही, खातरजमा करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पदरी निराशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 रेखा जरे यांच्या हत्येनंतर नगरच्या रेल्वे स्थानकावर सात-आठ दिवस राहिल्याचे मुख्य आरोपी बाळ बोठेने पोलिसांना सांगितले खरे; पण त्याची खातरजमा करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पदरी निराशा पडली आहे. रेल्वे प्रशासनाकडे त्या काळातील रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजच नाही. त्यामुळे पोलीस अस्वस्थ झाले असून, बोठेच्या त्या रहिवासाची खातरजमा कशी करायची? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

जरे हत्याकांडात बाळ बोठे याला पोलिसांनी हैदराबाद येथून पकडल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्या काळात त्याने पोलिसांना काही माहिती दिली होती. जरे यांच्या हत्येनंतर 3 ते 10 डिसेंबर या काळात नगरच्या रेल्वे स्थानकावर राहिल्याचे त्याने सांगितले होते. याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी रेल्वे प्रशासनाकडे चौकशी केली; पण त्यांच्याकडील सीसीटीव्हीच्या डीव्हीआरची कपॅसिटी केवळ 15 दिवसांचेच फुटेज ठेवण्याची असल्याने डिसेंबरच्या सुरुवातीच्या काळातील सीसीटीव्ही फुटेज नष्ट झाले आहे. परिणामी, बोठेच्या त्या सांगण्यात तथ्य आहे की नाही, याचा शोधही थांबला आहे. दुसऱया कोणत्या मार्गाने बोठेच्या या माहितीची खात्री करता येईल, याचा शोध आता पोलिसांकडून सुरू आहे.

सहाजणांची झाली चौकशी

फरार असतानाच्या काळात काहीजणांचा बोठेशी संपर्क होता. त्यांनी त्याला काही मदतही केल्याचे पोलिसांना बोठेकडूनच समजले होते. त्यामुळे त्यांना बोलावून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. सोमवारी केडगावच्या दोघांची चौकशी झाल्यानंतर मंगळवारी आणखी चौघांची पोलिसांनी चौकशी केली. आणखीही दोन-तीनजणांची नावे पोलिसांना समजली असून, त्यांनाही पोलिसांनी चौकशीला बोलाविले आहे.

तांत्रिक बाबीने ‘ती’ एक्झिट

बोठेचा पोलिसांच्या ताब्यातील फोन अचानक ‘ऑक्टिव्ह’ होऊन तो क्रमांक अनेक व्हॉट्सऍप ग्रुपमधून ‘लेफ्ट’ होण्याची घटना सोमवारी घडल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली होती; पण त्या चौकशीत केवळ तांत्रिक बाबीने तो क्रमांक अनेक व्हॉट्सऍप ग्रुपमधून लेफ्ट झाल्याचे पोलिसांना आढळले. व्हॉट्सऍपच्या पॉलिसीनुसार एखादा फोन नंबर सलग तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ व्हॉट्सऍपवर ऑक्टिव्ह नसेल, तर तो आपोआप ज्या ज्या ग्रुपमध्ये आहे, तेथून एक्झिट होतो. बोठेच्या त्या फोन क्रमांकाबाबतही असेच घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.