
‘यशस्विनी ब्रिगेड’च्या महिला जिल्हाध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्यासह सातजणांविरुद्ध पारनेर न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र मंगळवारी दाखल करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी अजित पाटील यांनी दिली. दरम्यान, रेखा जरे व बाळ बोठे यांच्यातील प्रेमप्रकरण, वादावादी आणि बदनामीची भीती ही या हत्याकांडाची मूळ कारणे असल्याचे उघड झाले आहे.
रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्याकांडानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर ऊर्फ गुडू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (रा. नगर) या पाचजणांना अटक केली होती. या घटनेचा सूत्रधार पत्रकार बाळ बोठे हा या घटनेतील मुख्य आरोपी आहे.
घटना घडल्यानंतर तो फरार झाला होता. त्यानंतर तीन महिन्यांनंतर 12 मार्चला पोलिसांनी हैदराबाद येथून बाळ जगन्नाथ बोठे याला अटक केली होती. त्यावेळी आरोपींमध्ये जनार्दन अकुला चंद्राप्पा, राजशेखर अंजय चाकाली (वय 25, रा. गुडूर करीमनगर, मुस्ताबाद, आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (वय 30, रा. बालापूर, सरूरनगर, रंगारेड्डी, आंध्र प्रदेश), अब्दुल रहमान अब्दुल आरिफ (वय 52, रा. चारमिनार मस्जीद, रंगारेड्डी, आंध्र प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. पी. अनंतलक्ष्मी वेंकटम सुब्बाचारी (रा. हैदराबाद) यांचा समावेश होता. या प्रकरणातील आरोपी महिला अद्यापि फरार आहे. याच वेळी नगरमधून महेश तनपुरे यालाही पकडण्यात आले होते. घटनेनंतर फरार झालेला बोठे हैदराबाद येथे कसा पोहोचला आणि पोलिसांनी त्याला कशी अटक केली, याची सविस्तर माहिती दोषारोपपत्रात दिली आहे.
पारनेर येथील न्यायालयामध्ये सुरुवातीला दोषारोपपत्र दाखल केले होते. ते 750 पानांचे होते. त्यामध्ये प्रारंभी अटक केलेल्या पाच आरोपींचा समावेश होता. बोठे याला अटक केल्यानंतर आज पारनेर येथील न्यायालयामध्ये सातजणांविरुद्ध दोषारोपपत्र तपास अधिकारी अजित पाटील यांनी दाखल केले आहे. या दोषारोपपत्रामध्ये बोठे याच्याकडून तपासामध्ये जी माहिती मिळालेली आहे, त्याचा सर्व उल्लेख करण्यात आलेला आहे.
साधारणतः 450 पानांचे हे आरोपपत्र असून, यामध्ये 26 जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. बोठे सध्या पारनेर येथील तुरुंगातच न्यायालयीन कोठडीत आहे. दोषारोपपत्र पारनेरला दाखल झाले असून, नंतर ते जिल्हा न्यायालयात पाठविले जाऊन तेथेच त्यावर पुढील सुनावणी होणार आहे. बोठेचा आयफोन अद्यापि प्रयोगशाळेतून तपासून आलेला नाही. त्यामुळे त्यासंबंधी येणारे पुरावे नंतर सादर केले जातील, असेही अजित पाटील यांनी सांगितले.
बोठे याने जरे यांना मारण्यासाठी सुपारी दिली असल्याचे यामध्ये उघड झाले आहे. बोठे याने 12 लाख रुपये देऊन हे हत्याकांड घडवून आणले आहे. बोठे याने जरे यांची हत्या झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासामध्ये आरोपी भिंगारदिवे याला पैसे दिले. भिंगारदिवेने आरोपी चोळके याला ठरल्याप्रमाणे त्याचे साडेतीन लाख रुपये दिले. भिंगारदिवे हा काही पैसे घरी ठेवून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाला. चोळके याने त्याला मिळालेल्या साडेतीन लाखांमधून दोन आरोपींना 50-50 हजार रुपये त्याच दिवशी दिले होते, असे आरोपींनी जबाबामध्ये म्हटले आहे.
नगर शहरातच शिजला कट
नगर शहरात दोन ते तीन ठिकाणी जरे यांना मारण्याचा हा कट शिजलेला आहे. बोठे व भिंगारदिवे यांनी हा कट रचला. दोषारोपपत्र दाखल करताना त्याचेसुद्धा पुरावे यामध्ये जोडण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी जरे यांना मारण्याचा कट रचण्यात आला, त्या ठिकाणचे पुरावेही पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. त्याचाही उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे.
बाळ बोठे व जरे यांचे प्रेमप्रकरण होते
बाळ बोठे व जरे यांच्यात प्रेमप्रकरण होते व या प्रेमप्रकरणातून त्यांच्यात वादावादी होत होती. यातून बदनामीच्या भीतीने हे हत्याकांड झाले आहे. बदनामी होऊ नये म्हणून ते एकमेकांशी सातत्याने फोनवर संपर्कात होते. काही दिवसांनंतर वेगवेगळे वागत होते. बोठे याची जरे यांच्यावर सतत नजर होती व तो त्या काळामध्ये कशा पद्धतीने कोणा कोणाच्या संपर्कात होता, याचासुद्धा उल्लेख या दोषारोपपत्रामध्ये केला आहे. त्याचे पुरावेसुद्धा पोलिसांनी दोषारोपपत्रामध्ये दिले आहेत.
450 पानांचे पुरवणी दोषारोपपत्र
पारनेर न्यायालयामध्ये बोठे याच्यासह सातजणांवर आज 450 पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले आहे. यात 26 जणांचे जबाब घेण्यात आले आहेत. त्यात शुभम गायकवाड, राजेश परकाळे, डॉ. मकासरे यांच्यासह अन्य काहीजणांचा समावेश आहे. या घटनेचा सर्व उलगडा आरोपी बोठेकडून घेऊन त्यामध्ये त्याचे झालेले इतरांशी संभाषण, तसेच आरोपींशी झालेली डील यांसह सर्वांचा गोषवारा आहे.
16 जणांचे 164 प्रमाणे जबाब
बोठे जेव्हापासून फरार झाला होता, या काळात तो कोणाकडे राहिला, याची माहिती घेऊन दोषारोपपत्रामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या दोषारोपपत्रामध्ये आतापर्यंत 16 जणांचे 164 प्रमाणे जबाब घेण्यात आलेले आहेत. पहिले व दुसरे दोषारोपपत्र मिळून 40हून अधिकजणांचे जबाब देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बोठेच्या कुटुंबातील व जरे यांच्या कुटुंबातील व्यक्तींचेसुद्धा जबाब आहेत.
साथ देणाऱयांवर 212 अन्वये गुन्हा
बोठे हैदराबादमध्ये होता त्यावेळी त्याला मदत करणाऱया सातजणांविरोधात कलम 212 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा खुनाच्या कटामध्ये सहभाग नाही; पण आरोपीला मदत करणे व अन्य कलमांअंतर्गत त्यांचा या प्रकरणामध्ये सहभाग आहे, असेही दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
पैसे कुठून आले, याचा झाला उलगडा
बाळ बोठेने 12 लाख रुपये कुठून व कसे आणले, याचा उलगडा दोषारोपपत्रात झाला आहे. ती रक्कम कोणाला, कशी व कुठे दिली, या व्यवहाराची नोंद करण्यात आली आहे. बोठे याने सागर भिंगारदिवे याला खुनाची सुपारी दिली होती व त्याचे संभाषण रेकॉर्ड झाले असून, तेसुद्धा पोलिसांनी या दोषारोपपत्रामध्ये दाखल केलेले आहे.रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर 2020 रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हत्या करण्यात आली होती.





























































