आठ तासांच्या ड्युटी बाबत अध्यादेश काढा! पोलीस कुटुंबीयांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई शहरातील जवळपास 90 पोलीस ठाण्यांत आठ तास ड्युटीचे कामकाज गेल्या 30 महिन्यांपासून यशस्वीरीत्या सुरू आहे. माजी पोलीस आयुक्त पडसलगीकर यांनी आठ तास ड्युटी सुरू केल्यामुळे पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण ही आठ तासांची ड्युटी कागदावर आणा. त्याचा कायदेशीर अध्यादेश काढा, हीच आमच्यासाठी दिवाळीची मोठी भेट ठरेल, असे पोलीस कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दोन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. पोलीस 12 पेक्षा अधिक तास काम करीत होते. परिणामी कुटुंबाला वेळ देता येत नव्हता, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेता येत नव्हती, अशा अनेक समस्या होत्या. त्यामुळे किमान पोलिसांची ड्युटी आठ तासांची करा अशी आर्त साद पोलीस पत्नींनी आयुक्तांना घातली होती. त्याची गंभीर दखल घेत पडसलगीकर, सहआयुक्त देवेन भारती यांनी नियोजनबद्धरीत्या पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी आठ तासांची केली. आता नवीन आयुक्त सुबोधकुमार जायसवाल यांनी देखील आठ तासांच्या ड्युटीला प्राधान्य दिले आहे. पण आता आठ तास ड्युटीचा तत्काळ अध्यादेश काढावा, अशी आमची मागणी असल्याचे पोलीस पत्नींनी दै. सामनाशी बोलताना सांगितले. या दिवाळीसाठी आम्हाला फराळ देऊ नका त्या बदल्यात तो अध्यादेश काढा हीच आमची मोठी दिवाळी भेट असेल असे पोलिसांच्या पाल्यांचे म्हणणे आहे. आठ तास कामकाज सुरू झाल्यापासून पोलीस वेळेत घरी जातात. कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवाराला वेळ देता येतो. वेळेत जेवण व आवश्यक तितका आराम मिळतो. परिणामी दुसऱ्या दिवशी काम करायला उत्साह येतो, कंटाळा येत नाही. त्यामुळे आठ तास ड्युटी फायद्याची ठरते, असे पोलीस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.