
आंबेनळी घाटात एक वर्षापूर्वीच्या भीषण बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठातील कर्मचाऱयांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज घेतला. या वारसांपैकी 19 जणांना गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गात नियुक्तीचा शासन आदेश जारी करण्यात आला असून त्याची प्रत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सावंत यांना कृषिमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली.
गेल्या वर्षी जुलैमध्ये कोकण विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱयांच्या बसला आंबेनळी घाटात अपघात झाला होता. त्यात मृत्युमुखी पडलेल्या अपघातग्रस्त कुटुंबीयांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याबाबत मागणी होती. त्यानुसार कृषी, वित्त, सामान्य प्रशासन विभागाने कार्यवाही करून गट ‘क’ व ‘ड’मधील 19 कर्मचाऱयांना रिक्त पदावर नियुक्तीचा शासन आदेश आज काढण्यात आला. कृषी विद्यापीठांची बैठक मंत्रालयात कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी या आदेशाची प्रत कोकण विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आली.


























































