
गुजरातमधील जामनगर आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) इन्फ्रास्ट्रक्चरचे नवे केंद्र बनणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मेटा यांनी एआय सक्षम डेटा सेंटर उभारण्यासाठी भागीदारी केली आहे. या प्रकल्पात रिलायन्सकडून जामनगरमध्ये पुढील दोन वर्षांत 168 मेगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर विकसित करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
डेटा सेंटरचे डिझाइन, बांधकाम, वीजपुरवठा, अक्षय ऊर्जा पुरवठा, नेटवर्क कनेक्टिव्हिटी तसेच संचालनाशी संबंधित सेवा व आवश्यक सेवांचे व्यवस्थापनाची जबाबदारी रिलायन्सकडे आहे. या प्रकल्पात रिलायन्स मेटासाठी एंड-टू-एंड इन्फ्रास्ट्रक्चर भागीदार म्हणून काम करणार आहे. मेटासाठी हे हिंदुस्थानातील पहिले विशिष्ट गरजेनुसार उभारलेले (बिल्ट-टू-सूट) डेटा सेंटर असणार आहे. यामुळे मेटाच्या एआय इन्फ्रास्ट्रक्चरला, मुख्य व्यवसायाला आणि मोठय़ा प्रमाणावरील संगणकीय क्षमतेच्या गरजांना मोठी मदत मिळणार आहे. ही भागीदारी सरकारच्या धोरणात्मक प्राधान्यांशी सातत्यपूर्ण असणार आहे.
धोरणात्मकदृष्टय़ा महत्त्वाचे ठिकाण
अक्षय ऊर्जा, पाण्याची उपलब्धता, जिओचे विस्तृत फायबर नेटवर्क आणि पश्चिम किनारपट्टीवरील समुद्राखालील इंटरनेट केबल लँडिंग स्टेशनची जवळीक यांसारखे अनेक फायदे उपलब्ध असल्याने जामनगर हे प्रकल्पासाठी धोरणात्मकदृष्टय़ा महत्त्वाचे ठिकाण आहे. कारण डेटा सेंटर अक्षय ऊर्जेवर चालणार असून त्याच्या शीतकरणासाठी प्रक्रिया केलेल्या समुद्राच्या पाण्याचा वापर करण्यात येणार आहे.

























































