ऑक्सिजनसाठी आता Reliance चा पुढाकार; दिवसाला एक हजार मेट्रिक टन प्राणवायूची निर्मिती करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात उद्भवलेल्या कोरोनाच्या दुसऱया लाटेत अनेक राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासनाबरोबर अनेकजण पुढे सरसावले असताना आता रिलायन्स उद्योग समूहानेदेखील एक पाऊल पुढे टाकले आहे. देशातील विविध प्लाण्टमधून जवळपास एक हजार मेट्रिक टन प्राणवायू निर्मिती करण्याचा संकल्प रिलायन्सकडून करण्यात आला असून यामुळे देशभरातील अनेक शहरांत ऑक्सिजन तुटवडा दूर होण्यास मदत होणार आहे.

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अनेक राज्यांत ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागल्याने अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर बनू लागली आहे. त्यामुळे देशातूनच नव्हे तर परदेशातूनसुद्धा मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे.  अनेक उद्योग समूहानेदेखील कोरोनाच्या या लढाईत हातभार लावत ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासनाला मदत करण्यास सुरुवात केली आहे. रिलायन्स उद्योग समूहाने कंपनीच्या जामनगर आणि इतरत्र इंधन शुद्धीकरण पेट्रोकेमिकल संकुले येथून दिवसाला 1000 मेट्रिक टन वैद्यकीय द्रवरूपातील प्राणवायू तयार करण्यास सुरुवात केली आहे.

अदानीने कोरोनाग्रस्तांसाठी आयात केला 780 टन ऑक्सिजन

देशात कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणी झपाटय़ाने वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर अदानी ग्रुपने तब्बल 780 मेट्रिक टन ऑक्सिजन परदेशातून आयात केला असून तो देशभरात वितरित केला जाणार आहे.

कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी अदानी ग्रुपकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. ठिकठिकाणी कोरोना सेंटर उभारण्याबरोबरच देशातील ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी 48 टँकरच्या माध्यमातून 780 मेट्रिक टन ऑक्सिजन आयात केला आहे. त्यामध्ये सौदी अरेबियातून 80 मेट्रिक टन, आयर्लंडमधून 140 टन, सिंगापूर 160 टन, तैवान 180 टन आणि दुबईतून 220 मेट्रिक टन ऑक्सिजन आयात केल्याचे अदानी ग्रुपने स्पष्ट केले आहे. तसेच 17 उच्च क्षमतेचे ऑक्सिजन निर्मिती कारखाने आणि 120 ऑक्सिजन कॉन्सण्ट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत.

नाशिकमधील शासकीय रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मिती

कोरोना संकट काळातील ऑक्सिजन टंचाईवर मात करण्यासाठी नाशिक जिह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे राहणार आहेत. पहिल्या टप्प्यातील 9 रुग्णालयांतील प्रकल्पासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 10 कोटी 88 लाखांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यात जिल्हा रुग्णालयासोबत मनमाड, येवला, कळवण व चांदवड उपजिल्हा रुग्णालय, तर सिन्नर, पिंपळगाव बसवंत, इगतपुरी आणि वणी यांचा समावेश आहे. तर केंद्र सरकारकडून नांदगाव, दाभाडी, पेठ, सुरगाणा या चार ठिकाणी आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या सीएसआर फंडातून दोडी व त्र्यंबकेश्वर येथे ऑक्सिजन प्लॅण्ट होणार आहे. यामुळे नाशिकमधील 31 शासकीय रुग्णालयांतील ऑक्सिजनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.