
कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनने आता मुंबईकरांच्या मदतीला धाव घेतली आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या वतीने वरळीच्या एनएससीआय, वांद्रे-कुर्ला येथील ट्रायडंट हॉटेल आणि सेव्हन हिल्स रुग्णालयात 875 खाटा उपलब्ध करून देत त्याचे संपूर्ण व्यवस्थापन पाहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रिलायन्स फाऊंडेशनने हा निर्णय घेतला आहे.
रिलायन्स फाऊंडेशन एनएससीआय येथे 15 मेपासून अतिदक्षता विभागात नवीन 100 खाटा, कृत्रिम श्वसन यंत्रणा, विविध वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देणार आहे. तसेच सध्या कार्यरत असलेल्या येथील 550 खाटांच्या वॉर्डचे व्यवस्थापन आणि सर्व खर्च 1 मेपासून सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय करणार आहे. त्यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी अशी 500 जणांची टीम उपलब्ध करून दिली जाणार आहे. रिलायन्स फाऊंडेशन सेव्हन हिल्स रुग्णालयात असलेल्या अतिदक्षता विभागातील 20 खाटांबरोबरच अन्य शंभर खाटांचे व्यवस्थापन करत आहे. आता येथील अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या 25 ने वाढवली आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागातील एकूण 45 खाटा आणि अन्य 125 खाटांचे व्यवस्थापन रिलायन्स करणार आहे. रिलायन्स नेहमीच देशसेवेसाठी अग्रेसर राहिली आहे. तसेच या कोरोना महामारीच्या काळात जनतेची सेवा करणे आम्ही आमचे कर्तव्य मानत असल्याचे फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी सांगितले.
किरकोळ लक्षणे असलेल्यांसाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये 100 खाटा
कोरोनाची किरकोळ लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी वांद्रे–कुर्ला संकुलातील ट्रायडंट हॉटेलमध्ये 100 खाटांची व्यवस्था करण्यात आली असून त्याचे व्यवस्थापन आणि खर्च रिलायन्स फाऊंडेशन करणार आहे.
























































