अतिवृष्टीबाधितांना मोठा दिलासा, 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्याच्या विविध भागात प्रचंड नुकसान झालेलं आहे. खासकरून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: पूरग्रस्त तसेच नुकसान झालेल्या भागांना भेट देत पाहणी केली होती. या पाहणीनंतर शुक्रवारी या अतिवृष्टीबाधितांना कशा पद्धतीने पुन्हा उभे करता येईल या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर बाधितांना आधार देण्यासाठी पॅकेजची घोषणा करण्यात आली.

वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते.

जून ते ऑक्टोबरअखेर राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे त्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुर्नउभारणीसाठी खालीलप्रमाणे राज्य शासनाने पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. शेती पिकांसाठी- जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी- 10 हजार प्रति हेक्टर (2 हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येईल), फळ पिकांसाठी- फळ पिकांच्या नुकसानीसाठी-25 हजार प्रति हेक्टर (2 हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येईल) आणि मृत व्यक्तीच्या वारसांना, मयत पशूधनासाठी, घरपडझडीसाठी भरीव मदत देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.

रस्ते,पूल-2635 कोटी

नगरविकास-300 कोटी

महावितरण, उर्जा- 239 कोटी

जलसंपदा-102 कोटी

ग्रामी रस्ते आणि पाणीपुरवठा-1000 कोटी

कृषी शेती घरासाठी- 5500 कोटी

एकूण- 9776 कोटी

आपली प्रतिक्रिया द्या