कुर्ला नेहरूनगर, टिळकनगर, सहकार नगरातील जीर्ण मलनिस्सारण वाहिन्यांचे नूतनीकरण करा – आमदार मंगेश कुडाळकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुर्ला विधानसभा क्षेत्रात असलेले नेहरूनगर, टिळकनगर, नवीन टिळक व सहकार नगरातील मलनिस्सारण वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. त्याचे उन्नतीकरण व नूतनीकरण करावे, याबरोबरच विविध प्रश्नांवर शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन चर्चा केली.

कुर्ला पूर्व-पश्चिम भुयारी मार्गाची दुरुस्ती करावी, येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी. स. गो. बर्वे मार्ग पूर्व आणि पश्चिम येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प पूर्ण झालेले असतानाही रस्त्यालगतच्या जागेचे पालिकेला हस्तांतरण झाले नसल्याची बाब आमदार मंगेश कुडाळकर यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. म्हाडा वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, चेंबूर-सांताक्रुझ जोड रस्त्याच्या पुलावरून खाली लोकमान्य टिळक टर्मिनस येथील प्रस्तावित केलेल्या पुलाचे काम, टिळकनगर पश्चिमेकडील नाल्यावरील जीर्ण झालेल्या पुलाचे नूतनीकरण, कुर्ला पूर्वेकडील मार्पेटसाठी आरक्षित असलेल्या भूखंडास संरक्षण भिंत लावून सुरक्षित करणे, त्यालगत असलेल्या बेस्टच्या जागेचा पुनर्विकास, टिळकनगर अग्निशमन केंद्राकरिता आरक्षित असलेला म्हाडाचा भूखंड हस्तांतरण प्रक्रियेस वेग देणे याबाबत चर्चा केल्याचे मंगेश कुडाळकर यांनी सांगितले.