10 दिवसांत खड्डे भरा, महापौरांचे आदेश

सामना ऑनलाईन, पुणे

पावसामुळे पुण्यातील बहुसंख्य रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये काही नगरसेवकांनी खड्ड्यांमुळे रस्त्यांची वाट लागली असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करत असल्याचं सांगितलं. या नगरसेवकांनी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली. यावर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका प्रशासनाला पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे 10 दिवसांत भरण्याचे आदेश दिले आहेत.

पावसाळा सुरू झाल्यानंतर रस्त्यांवर खड्डे उगवायला सुरुवात झाली. या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी व्हायला लागली आहे. पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुण्यातील रस्त्यांच्या अवस्थेला मेट्रोसाठी सुरू असलेल्या कामाला जबाबदार धरले आहे.  पुण्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक पोलीसही हैराण झाले आहेत. काही ठिकाणी वाहतूक पोलिसांनी स्वत:च खड्डे भरायला सुरुवात केली आहे.

सर्वसाधारण सभेत रस्ते विभागाचे वरिष्ठ अधिकारी  अनिरूद्ध पावसकर यांनी नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की ‘पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची पाहणी करण्यात आली होती. जिथे गरज होती तिथे पावसाला सुरूवात होण्याच्या आधी डागडुजीही करण्यात आली होती. पुण्यामध्ये मेट्रोसारखी विकासकार्ये सुरू आहेत. आम्ही रस्ते चांगल्या दर्जाचे बांधतो मात्र कधीतरी त्यावर खड्डे पडतातच.’

रस्ते विभागाच्या उत्तरामुळे महापौर मुक्ता टिळक यांचे समाधान झाले नाही. त्यांनी रस्ता बांधल्यानंतर एका वर्षाच्या आत खराब झाला तर त्या कंत्राटदाराविरोधात काय कारवाई करणार याची विचारणा महापौरांनी केली आहे. त्यांनी पुढच्या 10 दिवसात खड्डे भरण्याचेही आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या