हा गतिशील लोकशाही, राष्ट्रीय एकतेच्या भावनेचा उत्सव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दरवर्षी प्रजासत्ताक दिनी आपण आपल्या गतिशील लोकशाही आणि राष्ट्रीय एकतेच्या भावनेचा उत्सव साजरा करतो. कोरोना महामारीमुळे यंदाच्या उत्सवात भले साधेपणा असेल, परंतु आपली भावना नेहमीप्रमाणेच सशक्त आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी केले. 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना त्यांनी देशविदेशात राहणाऱया सर्व हिंदुस्थानींना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रजासत्ताक दिन हा आपल्या सर्वांना एका धाग्यात बांधणाऱया हिंदुस्थानी गौरवाचा उत्सव आहे, त्या महानायकांच्या स्मृतींना उजाळा देणारा दिवस आहे, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतुलनीय साहस दाखवले, स्वराज्यासाठी देशवासीयांमध्ये संघर्षाचा उत्साह जागवला, असे राष्ट्रपती कोविंद म्हणाले. सद्यस्थितीत संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर महामारीचा आघात झाला आहे. हिंदुस्थानने कोरोनाविरोधी लढय़ात असाधारण दृढसंकल्प आणि कार्यक्षमता दाखवली ही अभिमानाची बाब आहे. या संकटात आपण सर्व देशवासीय एक परिवार म्हणून एकमेकांशी कसे जोडले गेले आहोत हे सर्वांनी पाहिले आहे. महामारीत मानव समुदायाला एक-दुसऱयाला मदत करण्याचीच गरज आहे, असे राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले.

आज नवीन हिंदुस्थान उदयास येतोय!

मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज एक नवीन हिंदुस्थान उदयाला येतोय. हा एक मजबूत हिंदुस्थान, संवेदनशील हिंदुस्थान आहे, असेही राष्ट्रपती कोविंद यांनी म्हटले.

कोरोनाविरोधी उपायांत हयगय करता कामा नये

आज दोन वर्षांहून अधिक काळ लोटलाय, परंतु जगाचा कोरोनाविरोधातील संघर्ष अजूनही सुरू आहे. विषाणूचा प्रभाव अजूनही व्यापक प्रमाणात आहे. आपल्याला सतर्क राहिले पाहिजे, स्वसंरक्षणार्थ उपायांमध्ये हयगय करता कामा नये. आजपर्यंत जी सावधगिरी बाळगली ती ‘जैसे थे’ ठेवली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केले.