यंदाच्या चित्ररथात संतपरंपरेचा हरिगजर, अधिकृत घोषणा लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा ज्ञानोबा तुकारामाचा हरिगजर घुमणार आहे. कोरोनामुळे प्रतिवर्षीप्रमाणे चित्ररथाचा सोहळा तितक्या भव्यदिव्य प्रमाणात होणार नसला तरी, सर्व प्रकारचे नियम पाळून हा सोहळा होणार असून,या सोहळ्यासाठी राज्य सरकारने पाठविलेल्या संतपंरपरेच्या संकल्पनेवर केंद्रीय सांस्कृतिक खात्याने संमतीची मोहोर उमटवली आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसून लवकरच ती होणार आहे.

विविध राज्यातील सामाजिक व सांस्कृतिक पंरपरांचे दर्शन चित्ररथाच्या निमित्ताने राजपथावर होत असते. त्यासाठी प्रतिवर्षी निवडक राज्यांना रोटेशन पद्धतीनुसार संधी दिली जाते. कोरोनाचे संकट थोडे थंडावले असले तरी अजूनही धोका टळलेला नसल्यामुळे यंदाचा चित्ररथ होणार की नाही, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात होती.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते. मात्र, तिकडे कोरोनाची दुसरी लाट आल्याने जॉन्सन यांनी देशापुढील संकट लक्षात घेता हिंदुस्थान दौरा रद्द केला आहे. त्यामुळेही चित्ररथाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, चित्ररथ पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार होणार असून त्याचे स्वरूप व्यापक असणार नाही, असे सांस्कृतिक खात्यातील सूत्रांनी सांगितले.

संतपरंपरेचे गजर..

महाराष्ट्राला वैभवशाली अशी संतपरंपरा लाभली आहे. या संतपरंपरेचे विहंगम दर्शन यंदाच्या चित्ररथाच्या निमित्ताने देशाला होणार आहे. संत ज्ञानेश्वर तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत गोरोबा काका, संत चोखामेळा, संत जनाबाई यांच्यासह जवळपास तेरा संतांचा भक्तीअविष्कार आणि देखावा या चित्ररथाच्या माध्यमातून दाखविला जाणार आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत यासंह विविध संतसाहित्याच्या महतीचे दर्शनही देशाला होणार आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री अधिकृत घोषणा करणार

संतपरंपरा ही यंदाच्या चित्ररथाची संकल्पना आहे. मात्र, यासंदर्भातील अधिकृत घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख लवकरच करतील, अशी माहितीही सूत्रांनी दिली.