गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिनी सैनिकांचा हिंदुस्थानी हद्दीत घुसून भूभागावर कब्जा करण्याचा डाव हाणून पाडणाऱ्या वीरजवानांचा यंदाच्या प्रजासत्ताक मरणोत्तर शौर्यपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी 15 जून रोजी कर्नल संतोष बाबू आणि 16 बिहार रेजिमेंटच्या निधड्या छातीच्या जवानांचा चिनी जवानांनी केलेल्या भेकड हल्ल्याचा निकराने मुकाबला केला होता. या वीरजवानांनी हिंदुस्थानच्या भूभागावर कब्जा करण्याचे चीनचे मनसुबे उधळून लावले होते.  संरक्षण मंत्रालय तसेच हिंदुस्थानी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांकडून मात्र अजून या वृत्ताबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये.

चिनी सैनिकांनी हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी करत हिंदुस्थानसोबत चीनच्या सीमाकराराचा भंग केला होता.  पीपल लिबरेशन आर्मी म्हणजेच चीनच्या सैन्याने केलेल्या या घुसखोरीचा 16 बिहार रेजिमेंटने निकराने संघर्ष केला होता.  हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या बातमीमध्ये म्हटलंय की या संघर्षात सामील असलेल्या हिंदुस्थानी सीमेचे रक्षण करणाऱ्या 2 अधिकारी आणि 3 जवानांचा शौर्यपदकाने सन्मान केला जाणार आहे.

गलवान खोऱ्यातील पेट्रोलिग पाँईंट 14 भागामध्ये घुसलेल्या चिनी सैनिकांनी माघारी फिरण्यास नकार दिला होता.  चिनी सैनिक हे हिंदुस्थानी सैनिकांच्या तुलनेत संख्येने जास्त होते आणि ते दांडक्यांना काटेरी तारा गुंडाळलेली हत्यारे सोबत घेऊन आले होते. हिंदुस्थानी वीरजवान जरी चिनी सैनिकांच्या तुलनेत संख्येने कमी होते तरी त्यांनी प्रचंड धाडस दाखवत चिनी सैनिकांना माघारी जाण्यास भाग पाडलं होतं.  जवळपास 7 तास हा संघर्ष सुरू होता आणि अशा प्रकारची गेल्या 5 दशकातील ही पहिलीच घटना होती.

गलवान खोऱ्यातील या संघर्षात हिंदुस्थानच्या 20 जवानांना वीरमरण प्राप्त झालं होतं. संघर्षात सर्वात जास्त नुकसान हे चीनलाच झालं होतं.  या संघर्षात चीनचे किती जवान मारले गेले आहेत, याचा त्यांनी अधिकृतरित्या अजूनही खुलासा केलेला नाही. मात्र त्यांचे किमान 50 सैनिक ठार मारण्यात हिंदुस्थानी जवानांना यश आल्याचं सांगितलं जात आहे.  या 50 जणांमध्ये त्यांच्या कमांडिग ऑफिसरचाही समावेश आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षात हिंदुस्थानचे जे 20 जवान शहीद झाले आहेत, त्यामध्ये कर्नल संतोष बाबू यांचाही समावेश आहे. 16 बिहार रेजिमेंटच्या या 20 जवानांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरण्यात आली आहेत. हे स्मारक लेहमधील पोस्ट 120 मध्ये स्थापन करण्यात आले आहे.