
सामना प्रतिनिधी । मालवण
कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मालवण दांडी येथील मच्छीमार रेस्क्यू टीम गुरुवारी कोल्हापूरला रवाना झाली.
मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी अनेकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मदतीसाठी दांडी येथील मच्छीमारांच्या रेस्क्यू टीमने कोल्हापूर येथे जात मदत कार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही रेस्क्यू टीम कोल्हापूर येथे रवाना झाली. यात अन्वय प्रभू, राजू परब, नारायण आडकर, आबा आडकर, अजित आचरेकर, भूषण आचरेकर, रोहित आडकर, नाना जाधव, नारायण रोगे, भाई केळुसकर हे मच्छिमार बांधव सहभागी आहेत.
गुरुवारी सकाळी मालवण येथील आपली होडी ट्रक मध्ये घेऊन ही टीम निघाली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख तथा जि. प. सदस्य हरि खोबरेकर, उपशहर प्रमुख किरण वाळके, महेश शिरपुटे, शाखा प्रमुख मोहन मराळ, युवासेना उपशहर युवा अधिकारी अक्षय रेवंडकर यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या.
सिंधुदुर्गातही बचाव पथक सज्ज
सिंधुदुर्गातही अनेक गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून बचाव कार्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या होड्या चालविण्यास प्रशिक्षित चालक नाहीत. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्कालीन कक्षाने केलेल्या आवाहनानुसार श्रमिक मच्छीमारांचे २० जणांचे पथक सज्ज झाले आहे. याबाबत आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधून याची माहिती देण्यात आली आहे. अशी माहिती मालवणचे नगरसेवक नितीन वाळके, शिवसेना शहर प्रमुख बाबी जोगी यांनी दिली.




























































