
देशात डिजिटल व्यवहारांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढत आहेत, मात्र छोटय़ा रकमेच्या डिजिटल फसवणुकीत झालेल्या नुकसानीसाठी ग्राहकांना 25 हजार रुपयांपर्यंत आरबीआयकडून भरपाई दिली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी तसे स्पष्ट केले असून फसवणूक झालेल्या ग्राहकांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.
प्रस्तावित नुकसानभरपाई ही फक्त एकवेळ दिली जाणारी मदत असेल आणि त्यात गमावलेल्या रकमेच्या 85 टक्क्यांपर्यंत किंवा कमाल 25 हजार रुपयांपर्यंतच्या रकमेची भरपाई समाविष्ट असेल, असे गव्हर्नर म्हणाले. ग्राहकांची फसवणूक झाली आहे, मग ती त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे असो किंवा इतर कोणाच्याही चुकीमुळे, कोणताही प्रश्न न विचारता भरपाई दिली जाईल. चूक अनवधानाने झालेली असेल तर आम्ही त्यांना नुकसानभरपाई देऊ. पण दुष्ट हेतूने कारस्थानाचा प्रयत्न या ठिकाणी होऊ नये, असे मल्होत्रा यांनी सांगितले.





























































