कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई; नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड सेवा आरबीआयने केली बंद

भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील प्रतिष्ठाीत कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने या बँकेच्या सर्व ऑनलाईन सेवा, मोबाईल बँकिंग तसेच क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड सेवाही बंद केल्या आहेत. त्यामुळे कोटक महिंद्राच्या लाखो ग्राहकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. आयटी रिस्क मॅनेजमेंट, डेटा संरक्षण यांमध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत आरबीआयने बँकेवर कारवाई केली आहे.

कोटक महिंद्रा बँक व्यवसाय वाढीसह आयटी यंत्रणा अधिक सक्षम करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे आरबीआयने म्हटले आहे. 2022 आणि 2023 दरम्यान आरबीआयने बँकेतील आयटी यंत्रणा तसेच गोपनीय डेटाच्या संरक्षणाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आरबीआयने बँकेवर कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे. बँकेकडे सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी पुरेसा वेळ होता. परंतु बँकेने कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचलली नाहीत, असा आरोप आरबीआयने केला आहे.