
सामना प्रतिनिधी । अलिबाग
रायगड जिल्हा पोलीस दलात कार्यरत असणा-या महिला पोलीस कर्मचारी श्रीमती रेश्मा सुदाम डफळ यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
रेश्मा डफळ या 6 फेब्रुवारी 2012 रोजी रायगड पोलीस दलात भरती झाल्या असून सध्या त्या महाड पोलीस ठाण्यात वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत. पोलीस दलात कार्यरत असून देखील त्यांनी कुस्ती, जूडो, बॉक्सिंग या खेळाची आवड जोपासली असून त्यांनी आतापर्यंत पार पडलेल्या कोकण परिक्षेत्र क्रीडा स्पर्धेत कुस्ती, बॉक्सिंग या प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. तसेच अलिबाग येथील क्रीडा संकुल येथे झालेल्या स्पर्धेत जुदो कराटेच्या प्रकारात सुवर्णपदक मिळाले असून 2019 साली मुंबई महापौर चषक स्पर्धेत 3 सुवर्ण पदकांची कमाई केली.
आपले दैनदिन कर्तव्य सांभाळून त्यांनी क्रीडाक्षेत्रात भरीव कामगिरी करत रायगड पोलीस दलाचे नाव उंचावले आहे. पनवेल येथे झालेल्या राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेत चांगली कामगिरी केली. त्यांची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. त्याकरिता महाराष्ट्र स्पोर्ट अकॅडमी यांनी 1 मे महाराष्ट्र दिनी खेळ पुरस्कार देवून रेश्मा डफळ यांना सन्मानित केले आहे.
रेश्मा डफळ यांच्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर सर यांनी त्यांचे अभिनंदन केले असून यापुढे अशा विविध स्पर्धेत सहभाग घेवून रायगड पोलीस दलाचे नाव उज्ज्वल करण्याकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.































































