
मोहरम सणात दहशतवाद्यांकडून हल्ला घडवला जाण्याच्या भीतीने कश्मीर खोर्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कलम-370 हटवल्यापासून पाकिस्तानने जळफळाट सुरू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांचे संभाव्य हल्ल्याचे मनसुबे उधळून लावण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी बाळगली आहे.
कश्मीर खोर्यात मोहरमनिमित्त ताजियाच्या मोठ्या मिरवणुका निघतील. या मिरवणुकांदरम्यान दहशतवाद्यांकडून घातपाती कारवाया घडवल्या जाण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कश्मीरच्या बर्याच भागांत पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लाल चौकातील व्यावसायिक केंद्र व त्यासमोरील परिसरात सर्व प्रवेशद्वारांवर तारांचे कुंपण उभारले आहे. त्याचबरोबर सुरक्षा दलाचे मोठ्या प्रमाणावर जवान तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनाने कश्मीर खोर्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यामागील नेमक्या कारणांचा उलगडा केलेला नाही. मात्र मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी बाळगल्याचे बोलले जात आहे. केवळ तातडीची वैद्यकीय मदत आवश्यक असणार्या नागरिकांना बॅरिकेड्समधून प्रवेश दिला जाणार आहे. यापूर्वी 5 ऑगस्टला केंद्र सरकारने कलम 370चा ऐतिहासिक निर्णय घेतला, त्या वेळी कश्मीरमध्ये संचारबंदी लागू केली होती.
पाकला हिंदुस्थानचे चोख प्रत्युत्तर
कलम-370च्या निर्णयामुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानच्या सैन्याने रविवारी राजौरी जिह्यातील सुंदरबनी आणि नौशेरा प्रांतामध्ये अंदाधुंद गोळीबार केला. शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्या पाकिस्तानच्या सैन्याला हिंदुस्थानी लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र पाकिस्तानच्या गोळीबारात नौशेरा प्रांतातील कलाल आणि डिइंग गावातील घरांचे नुकसान झाले.

























































