महाराष्ट्रात 1 जूनपर्यंत निर्बंध वाढवले!  बाहेरील राज्यांतून येणाऱ्यांना RTPCR बंधनकारक

राज्यामध्ये लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांची मुदत 15 मेपर्यंत संपत असतानाच आणखी पुढील 15 दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर दुसऱयाच दिवशी आदेश जारी करण्यात आले असून आधीच्या नियमांत कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. उलट त्यात वाढ करीत बाजारपेठा, बाजार समित्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. तर बाहेरील राज्यांतून येणाऱयांना आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे.

राज्यात 15 मे नंतर लागू होणारे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. याविषयीचे मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच मंत्र्यांनी केलेल्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील 15 दिवस निर्बंध कायम ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आदेश जारी करीत हे निर्बंध 1 जूनपर्यंत लागू केले आहेत. याव्यतिरिक्त अजून काही निर्बंध लावण्यात आले आहेत. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत यासंदर्भातील शासन आदेश आज निर्गमित करण्यात आला आहे. साथरोग अधिनियम-1897,  तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदी अनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या पत्रकात म्हटले आहे की, ‘ब्रेक दि चेन’ संबंधी 13 एप्रिल 2021, 21 एप्रिल 2021 व तद्नंतर 29 एप्रिल 2021 रोजी घोषित केलेले सर्व निर्बंध 1 जून 2021 पर्यंत लागू राहतील. या व्यतिरिक्त आणखी काही निर्बंध लागू करण्यात आले असल्याची माहिती या आदेशात देण्यात आली आहे.

काय आहेत नवीन नियम

 • कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱया प्रत्येक व्यक्तीकडे आरटी-पीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.
 • मालवाहतूक करणाऱयांकरिता एका वाहनामध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्रच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना आरटीपीसीआरचा निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासांपूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.
 • दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.
 • स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (‘एसडीएमए’) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या 48  तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.

याआधीचे नियम

 • अत्यावश्यक म्हणून जाहीर केलेल्या भाजीपाला, किराणा दुकांनाना सकाळी 7 ते 11 या वेळेतच दुकाने सुरू ठेवता येणार
 • लोकल प्रवासाची मुभा केवळ आरोग्य कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱयांनाच
 • सरकारी कार्यालयांतही कर्मचाऱयांच्या 15 टक्के उपस्थितीतच कामकाज
 • लग्न समारंभ 25 जणांच्या उपस्थितीत आणि दोन तासांत उरकावे लागणार
 • अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवासावर बंदी

कोरोना साहित्य वाहतूक करणाऱयांना लोकल प्रवासाची परवानगी

कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील लोकांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.

 • देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱयांसाठी आरटीपीसीआर चाचणी तसेच 14 दिवस क्वारंटाइन बंधनकारक आहे.
 • जर शिस्तीचे पालन होत नसेल तर बाजारपेठांचे तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे काम बंद करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या