कोरोनाचे कारण पुढे करून बंद केलेला खासदार निधी तत्काळ सुरू करा! शिवसेनेची पंतप्रधानांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांना दिला जाणारा खासदार निधी हा त्या त्या मतदारसंघातील मूलभूत विकासकामांसाठीच वापरला जातो. मात्र, असे असतानाही कोरोनाचे कारण पुढे करून दोन वर्षांसाठी खासदार निधीच रद्द करण्याची केंद्र सरकारची भूमिका अनाकलनीय आणि सर्वपक्षीय खासदारांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे मतदारसंघातील अनेक विकासकामे खोळंबली आहेत. याचा विचार करून हा खासदार निधी तत्काळ सुरू करावा, अशी मागणी शिवसेनेने आज केली.

शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविस्तर पत्र लिहले असून, त्यात अनेक मुद्दयांचा उहापोह केला आहे. मतदारसंघातील शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, सडक निर्माण अशा विविध विकासकामांसाठी सरकारकडून प्रत्येक खासदाराला खासदार निधी दिला जातो. अनेकदा भूकंप, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ यासाठीही या निधीचा सदउपयोग होतो. 1993 मध्ये याच उद्दात हेतूने खासदार निधीची संकल्पना अंमलात आणली गेली होती, याची आठवण राऊत यांनी सरकारला करून दिली आहे. सरकारने 2020-21 व 2021-22 या दोन वर्षांसाठी खासदार निधीच रद्द केल्याने देशातील विविध भागातील विकासकामे खोळंबून पडली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी या नात्याने गोची होताना दिसत आहे. कोरोनासारख्या महामारीमध्ये खासदार निधी अधिक उपयुक्त ठरला असता मात्र, सरकारने उफारटा निर्णय घेऊन, खासदार निधी योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला आहे.  असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.