पाच दिवसांपासून मृतावस्थेत होते सैन्यातील निवृत्त कॅप्टन; झोपले आहेत असे समजत होता मुलगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सैन्यातून निवृत्त झालेले 72 वर्षांचे कॅप्टन राम सिंह त्यांच्या निवासस्थानी पाच दिवसांपासून मृतावस्थेत होते, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. मानसिक स्थिती ठीक नसलेल्या मुलासोबत राम सिंह हरियाणातील यमुनानगरमध्ये राहत होते. आपले वडील झोपले आहेत. त्यांना भूक लागल्यावर ते जेवणासाठी उठतील, असे त्यांच्या मुलाला वाटत होते. वडिलांचा मृत्यू झाला आहे, हे त्याला समजलेच नाही.

राम सिंह यांचा मुलगा प्रवीण गच्चीवर काही कपडे जाळत होता. हे बघून शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवीणला कपडे जाळण्याचे कारण विचारले. तेव्हा त्याने दिलेल्या उत्तरावरून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पोलिसांना समजले. त्याचवेळी प्रवीणच्या घरातून उग्र वास येत होता. पोलीस घरात गेल्यावर ही घटना उघडकीस आली आहे.

राम सिंह यांचा मृतदेह सडण्यास सुरुवात झाली होती. त्याचाच उग्र वास येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला. राम सिंह यांचा पाच दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हरियाणातील यमुनानगरच्या हुड्डा सेक्टर या उच्चभ्रू वस्तीत 72 वर्षांचे राम सिंह मुलगा प्रवीणसोबत राहत होते. प्रवीणची मानसिक स्थिती ठीक नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

राम सिंह यांची पत्नी आणि मुलीचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. पाच दिवसांपूर्वी राम सिंह रात्री झोपले ते उठलेच नाही. वडील झोपले आहेत. त्यांना भूक लागल्यावर ते नक्की उठतील, असे प्रवीणला वाटत होते. त्यांचा मृत्यू झाला आहे, हे त्याला समजलेच नाही. त्यामुळे तो पाच दिवस मृतदेहासोबतच राहत होता. तसेच वडिलांची झोपमोड होऊ नये, यासाठी तो त्यांच्याजवळही जात नव्हता. पोलीस तपासासाठी आले असता वडील झोपले आहेत, त्यांची झोपमोड होईल ,असेच त्याने पोलिसांनाही सांगितले.

प्रवीण गच्चीवर कपडे जाळत असल्याची तक्रार आल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याला कपडे जाळण्याचे कारण विचारल्यावर त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पोलिसांना समजले. तसेच त्याच्या घरातूनही उग्र वासही येत होता. त्यामुळे पोलीस राम सिंह यांच्या खोलीत गेले. तेव्हा राम सिंह यांचा मृतदेह सडण्यास सुरुवात झाल्याचे पोलिसांना समजले. पोलीस मृतदेह ताब्यात घेत असताना आपले वडील झोपले आहेत. त्यांची झोपमोड होईल. त्यांना भूक लागल्यावर ते जेवायला उठतील, असे प्रवीण पोलिसांना सांगत होता. पोलिसांनी प्रवीणला घडलेल्या घटनेची माहिती देत त्याला समजावले. त्यानंतर तो शांत झाला.

प्रवीणची मानसिक स्थिती ठीक नाही. राम सिंह कोणत्याही शेजाऱ्यांशी बोलत नव्हते. त्यामुळे त्यांच्याबाबत शेजाऱ्यांना फारशी माहिती नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याचा अहवाल आल्यावरच राम सिंह यांचा मृत्यू नेमका कशाने झाला ते स्पष्ट होणार आहे, असे तपास अधिकारी राम कुमार यांनी सांगितले. त्यांचा मृत्यू थंडीच्या लाटेने झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.