माजी पोलीस महानिरिक्षकाच्या मुलीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। पाटणा

पाटणा येथे एका तरुणीने रविवारी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणीचे नाव स्निग्धा असून ती माजी पोलीस महानिरिक्षक सुधांशु कुमार यांची मुलगी आहे. किशनगंज येथील जिल्हा न्यायदंडाधिकारीबरोबर महेंद्र कुमार यांच्याबरोबर स्निग्धाचा शनिवारी साखरपुडा झाला होता. सोमवारी त्यांचे लग्न होणार होते. स्निग्धाच्या आत्महत्येची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान स्निग्धाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

स्निग्धा पटेल नगर येथे राहत होती. पण रविवारी सकाळी सातच्या सुमारास ती गाडीतून उदयगिरी अपार्टमेंट या सगळ्यात टोलेजंग इमारतीत आली होती. ड्रायव्हरला तिने गाडी लांब पार्क करायला सांगितली. त्यानंतर तिने इमारतीत प्रवेश केला. सुरक्षा रक्षकाने तिला कोणाकडे जायचे असे विचारले असता तिने 12 व्या मजल्यावर राहणाऱ्या महिला आएएस अधिकाऱ्यांकडे जायचे आहे असे सांगितले. त्यानंतर ती लिफ्टमधून वर गेली. पण 20-25 मिनिटांनी जोरात काहीतरी पडण्याचा आवाज आला. यामुळे सुरक्षा रक्षकाने आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी स्निग्धा रक्ताच्या थारोळ्यात तिथे पडल्याचे त्याला दिसले. सुरक्षा रक्षकाने तात्काळ याबद्दल पोलिसांना कळवले. दरम्यान, पोलिसांनी इमारतीच्या प्रवेशद्वारावर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा तपासला असता यात स्निग्धा 13 व्या मजल्यावर लिफ्टमधून उतरल्याचे दिसले. त्यावेळी तिच्या हातात एक स्टूल होता. 13 व्या मजल्यावर उतरल्यावर ती जिन्यावरून 14 व्या मजल्यावर गेल्याचे सीसीटीव्हीत दिसले. यामुळे इमारतीच्या छताच्या रेलिंगवर स्टुल ठेवून तिने उडी मारली असावी असा शक्यता वर्तवण्यात येत आहे.