निवृत्त अधिकाऱयाची केली फसवणूक 

गॅस लाइनचे बिल भरण्याच्या नावाखाली सायबर ठगाने एका केंद्र सरकारच्या कंपनीतील निवृत्त वरिष्ठ अधिकाऱयाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार हे निवृत्त वरिष्ठ अधिकारी आहेत. तीन दिवसांपूर्वी ते घरी असताना त्यांना एकाचा फोन आला. फोन करणाऱयाने तो महानगर गॅस कंपनीतून बोलत असल्याचे भासवले. तुमच्या घरच्या गॅस पाईप लाइनचे बिल थकले आहे. वेबसाइटवर तुमचा डेटा अपडेट करावा लागेल. त्यासाठी 12 रुपये ऑनलाइन फी भरावी लागेल असे सांगितले. गॅस पुरवठा खंडित होईल या भीतीने फी भरण्यास होकार दर्शवला. त्यानंतर ठगाने त्यांना व्हॉट्सअॅपवर फोन केला. एका वेबसाइटवर जाण्यास सांगितले. त्या वेबसाइटवर जाऊन माहिती भरण्यास सांगितली. माहिती भरल्यावर त्याच्या खात्यातून पैसे काढले गेले.