महसूलवाढीसाठी महापालिकेचा ऍक्शन प्लॅन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक मंदी, मुदत ठेवींवरील घटलेला दर यामुळे पालिकेचे उत्पन्न घटल्याने आता उत्पन्नवाढीसाठी मुंबई महानगरपालिकेने ऍक्शन प्लॅन तयार केला असून त्यानुसार त्रिसूत्री कार्यक्रम राबवला जाणार आहे. यात मालमत्ता कराची कोटय़वधींची थकबाकी वसूल करणे, एफएसआयचा गैरवापर नियमित करणे आणि नवीन लीज धोरण तयार करून दरवर्षी कोटय़वधींचा महसूल मिळवणे यांचा समावेश आहे.

पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी नवे तीन पर्याय वापरले जाणार असल्याचे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितले. यात मालमत्ता कराची थकबाकी, एफएसआयचा गैरवापर करून बांधलेली बांधकामे नियमित करणे आणि नवीन लीज धोरण तयार करून नवीन भाडे आकारणे असे पर्याय आहेत. केंद्र सरकारने सेवा आणि वस्तू कर (जीएसटी) लागू केल्यामुळे मुंबई महानगरपालिकेला जकात कर रद्द करावा लागला. जकात कर बंद झाल्याच्या भरपाईपोटी राज्य सरकार पालिकेला दर महिन्याला 750 कोटी रुपये देते, मात्र एवढय़ावर थांबून न राहता पालिका उत्पन्नवाढीचे नवे पर्याय शोधत आहे.

आरक्षित भूखंडाच्या बदल्यात ‘टीडीआर’

उद्याने, सार्वजनिक वाहनतळ, मनोरंजन मैदाने यासाठी आरक्षित असलेले भूखंड पालिका कोटय़वधी रुपये देऊन खरेदी करते, मात्र त्यावर अतिक्रमण केल्यामुळे पालिकेला अशा जागांचा विकास करणे अवघड जाते. अशा जागांवर अतिक्रमण करणाऱयांचे पुनर्वसनही करावे लागते. हा सगळा भुर्दंड पालिकेला सोसावा लागतो. त्यामुळे असा अतिक्रमण केलेला भूखंड खरेदी करण्यासाठी विकासकाला विकास हस्तांतर हक्क (टीडीआर) देण्याचा निर्णय पालिकेने अर्थसंकल्पात घेतला आहे.

मालमत्ता कर थकवल्यास जप्ती

मुंबईकरांनी पालिकेचा 15 हजार कोटींचा मालमत्ता कर थकवला आहे. या मालमत्ता कराची आता वसुली करण्यावर भर दिला जाणार आहे. थकबाकीदारांना प्रथम नोटिसा पाठवल्या जाणार आहेत. नोटिसांनंतरही गृहनिर्माण संस्था किंवा मालकांनी मालमत्ता कर भरला नसेल तर त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने ही वसुली केली जाणार असून 2020-21 आर्थिक वर्षात 6 हजार 700 कोटी वसूल करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवले आहे.