
>> अक्षय शेलार , [email protected]
प्रेक्षक, दिग्दर्शक आणि स्टुडिओ या तिघांचं नातं नव्यानं घडवून आणणारा काळ म्हणजे `हॉलीवूड रेनॅसान्स’चा काळ. या न्यू हॉलीवूड ठरलेल्या काळातील निवडक चित्रपट आणि दिग्दर्शकांचा अधिक खोलवर विचार करीत त्या कलाकृतींचा वेध घेणारे सदर.
अमेरिकन सिनेमाच्या इतिहासात 1967 हे वर्ष एका मोठय़ा बदलाची रुजुवात करणारं ठरलं. आर्थर पेन दिग्दर्शित `बॉनी अँड क्लाइड’ हा चित्रपट पडद्यावर आला आणि हॉलीवूडच्या पायाला हादरा देऊन गेला. पारंपरिक स्टुडिओ प्रणालीच्या पलीकडे जाऊन आधुनिक संवेदनांना भिडणारा, हिंसा आणि रोमँटिकता यांची नवी, विलक्षण सांगड घालणारा हा सिनेमा `न्यू हॉलीवूड’ चळवळीचा उद्घोष ठरला.
1960 च्या दशकाच्या मध्यात हॉलीवूड गोंधळलेलं होतं. जुन्या सांगीतिका (म्युझिकल्स) आणि भव्यदिव्य इतिहासपट अपयशी ठरत होते. या पार्श्वभूमीवर नव्या प्रकारच्या कथांची मागणी होती. युरोपियन आर्ट सिनेमाकडे वळलेला प्रेक्षक आपल्या समाजाशी थेट बोलणारा, वास्तवातल्या नैतिक गुंतागुंतीला न घाबरणारा सिनेमा शोधत होता. याच काळात `बॉनी अँड क्लाइड’ आला आणि या शोधाचं उत्तर मिळण्याची शक्यता निर्माण झाली.
बॉनी पार्कर (वॉरेन बीटी) आणि क्लाइड बॅरो (फे डनवे) ही वास्तववादी पात्रं अमेरिकन महामंदीच्या काळातली आहेत. बँका लुटणारे, पोलिसांशी झुंजणारे हे गुन्हेगार, पण चित्रपटाने त्यांना केवळ गुन्हेगार म्हणून न दाखवता तरुणाईचं प्रतीक, उत्कट प्रेमी आणि एका सबंध सामाजिक व्यवस्थेविरुद्ध उभे ठाकलेले बंडखोर म्हणून उभं केलं व हेच न्यू हॉलीवूडचं वैशिष्टय़ होतं. पारंपरिक `सुवर्णकालीन नायक’ (गोल्डन एज हिरो) गेला आणि त्याजागी नैतिक संदिग्धतेत अडकलेला अँटी-हिरो आला. क्लाइड हिंस्र आहे, अपयशी आहे, पण तरीही प्रेक्षकांना जवळचा वाटतो. बॉनीच्या नजरेतून त्यांचं रूपांतर होतं: ती त्याच्या बरोबर जाते आणि सोबत प्रेक्षकही.
`बॉनी अँड क्लाइड’ने चित्रपटीय भाषेचं बंधन मोडलं. त्यापूर्वी कधीही अमेरिकन सिनेमात हिंसेचं चित्रण एवढय़ा थेटपणे झालं नव्हतं. गोळीबाराने झोडपली जाणारी शरीरं, रक्ताचे उडालेले शिंतोडे, स्लो-मोशनचा वापर ही सगळी तंत्रं त्याआधी युरोपियन सिनेमात दिसली होती, पण हॉलीवूडच्या मुख्य प्रवाहात इतकी उघडपणे आली नव्हती. बॉनी आणि क्लाइडच्या शरीरावर कोसळणाऱया गोळ्यांचा पाऊस हा शेवटचा प्रसंग तर अगदी आजही हादरवतो.
मात्र सिनेमा हिंसा आणि वास्तवदर्शी रेखाटनाबरोबर हलकेफुलके, विनोदी आणि रोमँटिक क्षणही निर्माण करतो. गमतीशीर संवाद, विचित्र परिस्थिती, गँगमधल्या पात्रांचे मानवी पैलू हे सगळं रक्तपातापुढे दिसतं. या विरोधाभासामुळे सिनेमा अधिक जिवंत वाटतो. हिंसा आणि हास्य यांची ही सांगड न्यू हॉलीवूडच्या पुढच्या सिनेमांची खूण ठरली.
आधीच्या हॉलीवूड सिनेमात हिंसा बहुधा सौम्य, पुसट किंवा सूचक स्वरूपात दाखवली जात असे. आर्थर पेनच्या या चित्रपटाने मात्र रक्तपात, शरीरावर गोळ्या लागल्याचा धक्का देणारा प्रभाव आणि अखेरच्या दृश्यातील गोळ्यांच्या वर्षावाने तयार केलेला थरकाप अशा दृश्यांद्वारे प्रेक्षकांना हादरवून सोडलं. विनोद, प्रणय आणि अचानक उसळणारी हिंसा यांचा केलेला संगम त्या काळात नवीन होता. या प्रयोगामुळेच पुढे सॅम पेकिन्पाच्या `द वाइल्ड बंच’सारख्या (1969) चित्रपटांतील हिंसा अधिक तीव्र, शैलीदार आणि वास्तवदर्शी झाली. `बॉनी अॅण्ड क्लाईड’ने केवळ हिंसा दाखवली नाही, तर प्रेक्षक हिंसेकडे कशा दृष्टीने पाहतात, याचं समीकरण बदलून टाकलं.
हा चित्रपट पडद्यावर येण्यापर्यंतचा त्याचा प्रवास मात्र खडतर होता. पटकथा लेखक डेव्हिड न्यूमन आणि रॉबर्ट बेंटन यांनी सुरुवातीला हॉलीवूड स्टुडिओंना पटकथा दिली, पण कोणीच ती निर्माण करण्यास तयार होत नव्हतं. गुन्हेगारांचं इतकं रोमँटिक चित्रण अमेरिकन प्रेक्षक मान्य करणार नाही, असं सर्वांचं मत होतं. वॉरेन बीटीने मुख्य भूमिका करण्यासोबतच निर्मितीची जबाबदारी स्वीकारली. त्याच्या आग्रहामुळे आर्थर पेन दिग्दर्शक म्हणून आला.
`अनावश्यक हिंसा, नैतिकतेचा अभाव’ अशा आरोपांचा भडिमार झालेल्या या चित्रपटात तरुण प्रेक्षकांना स्वतचं प्रतिबिंब दिसलं. त्यांच्या अस्वस्थतेला, समाजाविरोधातील रागाला या चित्रपटाने ठाम आवाज दिला. या चित्रपटाने दाखवून दिलं की, हॉलीवूड केवळ सुरक्षित, साचेबद्ध मनोरंजनापुरतं मर्यादित नाही, तर ते (तत्कालीन) विद्यमान व्यवस्थेला प्रश्न विचारू शकतं, प्रेक्षकांना हादरवू शकतं आणि तरीही यशस्वी होऊ शकतं.
`बॉनी अँड क्लाइड’च्या यशामुळे स्टुडिओंनी दिग्दर्शकांना अधिक स्वातंत्र्य द्यायला सुरुवात केली. `इझी रायडर’, `द ग्रॅज्युएट’, `द गॉडफादर’, `टॅक्सी ड्रायव्हर’ हे सर्व चित्रपट याच पायावर उभे राहिले, पण ही सुरुवात `बॉनी अँड क्लाइड’शिवाय अशक्य होती.
`बॉनी अँड क्लाइड’ ही केवळ एका गुन्हेगार जोडप्याची कथा नाही, तर तो अमेरिकन सिनेमाच्या बदलत्या चेहऱयाचा दस्तऐवज आहे. हॉलीवूडच्या जुन्या चौकटीला छेद देऊन हिंसा, बंडखोरी आणि प्रेम यांना नव्या पद्धतीनं पडद्यावर आणणारा हा सिनेमा आहे.