अलवार… अबोल प्रेमकथा!

432

>> डॉ. विजया वाड

स्वामी – रणजित देसाईंची तरल, उत्कट कादंबरी. रमा माधवाच्या या प्रेमकथेची अजूनही पारायणे होतात.

रमा-माधवाची कहाणी सध्या ‘स्वामिनी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरी रोज पोहोचते आहे. तिचा गाजलेला साहित्याविष्कार म्हणजे ‘स्वामी’ ही रणजित देसाई यांची अमर कादंबरी. एक नव्हे, दोन नव्हे, 16 आवृत्त्या! या कादंबरीची भाषा तुम्हाला तिच्या प्रेमात पाडते. रमा, माधवराव, गोपिकाबाई, दादासाहेब (राघोबादादा), आनंदीबाई, पेशवेकालीन सरदार-दरकदार, नोकरवर्ग, स्त्र्ायांचे जग, पुरुषांचे पराक्रम… सारे जणू तुमच्याशी बोलतात नि तुमच्या अंतरंगाचा कब्जा घेतात. डोळय़ांना पाण्याची धार लागावी नि हृदय उलून निघावे अशी भाषाशैली. रणजित देसाई या लेखकाला वलयांकित करणारी कादंबरी आहे ही. गेल्या कितीक पिढय़ांनी ‘स्वामी’ची पारायणे केली. पहिली आवृत्ती 1962 साली निघाली नि अठरावी 1995 त. म्हणजे पिढय़ान्पिढय़ांचे लाखो वाचक! नाही का मित्रांनो?

15 फेब्रुवारी 1745 हा श्रीमंत माधवराव पेशवे यांचा जन्म. 9 डिसेंबर 1753 ला त्यांचा रमाबाईंशी विवाह झाला. 1761 ला पेशवाईची वस्त्र्ाs त्यांनी अंगावर चढवली अन् वैभवशाली कारकीर्द 1772 साली 18 नोव्हेंबर रोजी संपलीही. अवघे सत्तावीस वर्षांचे आयुष्य! पण शतकानुशतके लोक त्यावर प्रेम करीत आहेत.

दादासाहेब म्हणजे राघोबादादा. त्यांचे मोठे प्रस्थ! पण वैचारिक मतभेद टोकाचे! माधवरावांना गादीवर बसविले खरे, पण रागाची उसळी सारी नातीगोती विसरायला लावेल इतकी मोठी!

माधवाने काही विरोध केला की तोंडी संन्यास, गंगातीरी जाण्याची भाषा! काही माणसे मनाने निर्मळ आणि स्वच्छ असली तरी क्रोध सर्व विनम्र नि सद्भावनांचा विनाश करतो. राघोबादादा हे त्याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणायला हवे. त्यांच्या स्वभावाचे बारीकसारीक कंगोरे या कादंबरीत अतिशय बारकाईने नोंदले गेले आहेत. महत्त्वाची गोष्ट ही आहे की, जेव्हा कादंबरीतील पात्रे वाचकांना आत्मपरीक्षणास भाग पाडतात तेव्हा ती कलाकृती यशस्वी गणली जाते.

राजकारण आणि कारस्थाने यांचे किती जवळचे नाते आहे हे ही कादंबरी वाचताना क्षणोक्षणी प्रत्ययाला येते. काका, पुतणे युद्ध करण्यासाठी समोरासमोर ठाकणे यापरते दुःख नाही, पण ते झाल्याखेरीज इतिहास घडत नाही. पेशवाईला लागलेला भाऊबंदकीचा शाप मोठा हानीकारक आहे.

त्यात माधवरावांची प्रकृती वारंवार बिघडण्याने रमेची मनःस्थिती पार बिघडून जाते. गोपाळराव पटवर्धन कायम माधवरावांच्या बाजूचे निकटवर्ती सहकारी तर पुरंदरे, सखारामबापू यांनी राघोबादादांची तळी उचललेली असते.

राघोबादादांपुढे पराभव झाल्यावर संपूर्ण शरणागती पत्करणारे श्रीमंत माधवराव पेशवे काकांच्या चरणांवर डोके टेकतात नि तत्पूर्वी पेशवाईचा शिरपेच काकांपुढे ठेवतात तो प्रसंग इतका उत्कट लिहिला गेला आहे की, मन गलबलून जाते, डोळे ऐकत नाहीत. याला लेखणीचे यश म्हणायचे नाही, काय प्रिय वाचकांनो? नाते बिघडविण्यास गादीभोवतीची माणसे सज्ज असतानाच ना! येथेही कान भरायला बापू आहेतच. त्यातून राघोबा पडले हलक्या कानाचे! पटकन वश होतात नि चुकीचे निर्णय घेतात.

रमा-माधवाचे प्रेम या कलाकृतीत अतिशय संयतपणे व्यक्त झाले आहे. पेशवाईचा काळ मूर्तिमंत जगतोच आपण कादंबरी वाचताना. मला आठवते, तरुणपणी मी या कादंबरीची पारायणे केली आहेत.

दादासाहेबांचा ‘शौकीन’ स्वभाव यात वारंवार प्रत्ययाला येतो. रमेची पतीवरील अनन्य निष्ठा पाहून जिवास या नात्याने संतुष्टी येते. या कादंबरीतील नारायणराव या माधवरावांच्या लाडक्या धाकटय़ा बंधूंचे पात्रही आहे. त्यांचा निरागस संवाद (दादा-वहिनीशी) मन प्रसन्न करतो.

हैदर आणि निजामाचे हल्ले यांनी कादंबरीचा काही भाग व्यापला आहे, पण खऱया अर्थाने ही कादंबरी रमाबाईंच्या स्वामींची आणि पेशवाईच्या सूर्याचीच आहे.
पार्वतीबाईंचे पती सदाशिवरावभाऊ यांचे नाहीसे होणे, पार्वतीबाईंना त्याचा होणारा क्लेष हा नाजूक भाग इतका हळुवार रंगविला आहे की, डोळे सजल व्हावेत. मन दुखावे, अंतःकरण हेलावावे.

माधवरावांचा आजारपणाने मृत्यू आणि रमाबाईंचे सहगमन हा भाग वाचताना मन पार त्या काळात जाते. जणू प्रसंग आपणासमोर घडत आहे. सतीची वस्त्र्ां परिधान केलेली रमा, दुतर्फा गर्दीतून माधवरावांसह चितेवर चढणारी, पण वाटेत आयाबायांना आपले अलंकार देऊन विरक्त होणारी रमा… सारे वर्णन इतके उत्कटपणे पुढय़ात येते की, जणू आपण तो काळ जगत आहोत.

येणाऱया प्रत्येकाला अलंकार वाटणाऱया रमेला आपण बघतो, आपण रडतो. आपल्या मनातला महाल रिकामा होतो नि ते रितेपण आपल्याला छळते. इतका अस्वस्थ जीवनानुभव ‘स्वामी’कार लेखक रणजित देसाई आपल्याला देतात. 1745 ते 1772 एवढेच 27 वर्षांचे आयुष्य! पतीबरोबर सहगमन करणारी रमा त्याहूनही लहान. सारखे वाटत राहते, आपण इतके जगलो… पण माधवरावांनी एवढय़ाशा जीवनावधीत जे केले ते इतके महान होते की, त्यांच्या पासंगालाही आपण पुरणार नाही. स्वामी का वाचावी याचे उत्तरच मुळी जीवन कसे ‘जागते’ जगावे या प्रणालीत आहे.

स्वामी – रणजित देसाई
प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस
18 वी आवृत्ती
मूल्य – 90 रुपये z पृष्ठs ः 424

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या