कागर- राजकारणाच्या पटावरची अनिवार्य होरपळ

139

>> रश्मी पाटकर

राजकारण हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग. माणसाच्या समूहजीवनात या घटकाची अटळता वारंवार, वेगवेगळ्या अर्थांनी अधोरेखित होत आली आहे. पण राजकारण हे साधं सोपं कधीच नसतं. त्यात महत्त्वाकांक्षा, मत्सर, लोभ, कौर्य अशा सर्व भावनांची सरमिसळ झालेली असते. काळाच्या ओघात राजकारणाचं रूप बदलत गेलं असलं तरी त्याच्या मुळाशी असलेली सत्तापिपासू वृत्ती मात्र कायम राहिली आहे. सध्या राजकारणावर अवघ्या देशात उहापोह होत आहे. राजकारणाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेला कागर हा चित्रपट राजकीय पटावरची अनिवार्य आणि अटळ होरपळ दाखवतो.

कागर या शब्दाचा अर्थ आहे अंकुर. राजकारणात सत्ताकांक्षेचे अनेक लसलसते अंकुर एकमेकांवर सतत कुरघोडी करत असतात. त्याची चित्तरकथा कागरमध्ये दिसून येते. चित्रपट सुरू होतो तो विराईनगर या गावातल्या राजकारणाच्या स्थितीपासून. विराईनगरमध्ये सध्या आबासाहेब गायकवाड नावाच्या आमदाराची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. कारण, तिथेच त्याचा पुतण्या भैय्याराजे हाही आमदार पदाचा भावी आणि लोकप्रिय उमेदवार म्हणून पुढे येऊ पाहतोय. या बुद्धिबळाच्या पटावरचा वजीर आहे गुरुजी उर्फ प्रभाकर देशमुख हा माणूस. ग्रामीण राजकारण कोळून प्यायलेला हा माणूस विराईनगरचं राजकारण बदलू पाहतोय. त्यासाठी जे जे म्हणून शक्य आहे ते करतोय. त्याच्या हाताखाली तयार होणारा युवराज हा तरुण. युवराजची स्वतःची काही स्वप्न आहेत. ती त्याला पूर्ण करायची आहेत. त्यात त्याचं गुरुजीच्या मुलीवर प्रियदर्शनी उर्फ राणीवर प्रेम आहे. तेही त्याला पूर्णत्वाला न्यायचंय. या सगळ्या परिस्थितीत आमदार पदासाठीची निवडणूक येऊन ठेपते आणि सुरू होतो बुद्धिबळाचा एक क्रूर डाव. त्या डावात अनेक प्यादी हलवली जातात. सरळ, तिरक्या, दुडक्या सर्व चाली वापरून हा डाव रंगवण्याचा प्रयत्न होतो आणि डाव रंगण्याच्या नादात अनेकांचे हात रक्ताने माखले जातात. शेवटी नेमकं कोण जिंकतं? रक्ताचा नातेवाईक असो किंवा कट्टर वैरी, कोणालाही क्षमा न करणारं राजकारण नेमका कोणाचा बळी घेतं आणि कोणाच्या आकांक्षांना नवा कागर फुटतो, ते मात्र चित्रपटातच पाहण्यासारखं आहे.

पाहा कागरचा ट्रेलर-

कागर या चित्रपटाची पार्श्वभूमी ग्रामीण असल्याने आणि त्यात नायिका म्हणून सैराटफेम रिंकू राजगुरू झळकल्याने त्यावर सैराटचा प्रभाव जाणवतो. अनेक प्रसंग हे सैराटमधूनच सहीसही उचलल्यासारखे वाटतात. पण, मूळ कथा आणि पटकथा सैराटपेक्षा संपूर्ण भिन्न आहे. यातला एक धागा प्रेमकथेचा असला तरी मूळ संहिता ही राजकारणाशी निगडीत आहे. त्यामुळे इथे गोड-गुलाबी स्वप्नांनाही धारदार किनार दिसते. ग्रामीण भागातले शेतीचे प्रश्न, त्याच्यावर आधारलेली आर्थिक गणितं आणि पर्यायाने राजकीय पटलावर होणारे बदल यांचा यात समावेश आहे. त्यामुळे पटकथा त्या अनुषंगाने फुलत जाते. काही ठिकाणी दिग्दर्शक सैराटच्या प्रभावाखाली आहे की काय अशी शंका यावी इतपत प्रसंगांमध्ये साम्य वाटतं. पण, नेटके संवाद आणि प्रतीकात्मक चित्रण यांमुळे पटकथा प्रभावी ठरते. चित्रपटाचा विषय क्लिष्ट असला तरी त्याची मांडणी सुटसुटीत आहे. सुरुवातीला संथ वाटणारी कथा हळूहळू वेग घेत जाते आणि प्रेक्षक त्यात गुंतत जातो. मानवी नात्यांमधली कुतरओढ, सत्तेच्या हव्यासापोटी येणारं भावनिक आंधळेपण आणि त्यातून घडणारा रक्तपात यामुळे मन विषण्ण होतं आणि तिथेच दिग्दर्शक यशस्वी होतो. मध्यंतरापर्यंत कथासूत्र एका लयीत पुढे जातं, मध्यंतरानंतर चित्रपट संथ होतो तरी घटना वेगाने घडत असल्याने चित्रपटाची पकड सैल होत नाही.

अभिनयाबाबत म्हणायचं झालं तर रिंकू राजगुरू हिचा हा दुसराच चित्रपट असल्याने तिच्यावर अजूनही सैराटचा प्रभाव जाणवत राहतो. तिने भूमिका उमजून केली असली तरी काही महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये तिला भूमिकेची खोली जाणवली नसल्याचं कळून येतं. त्या तुलनेने शुभंकर तावडे या अभिनेत्याने भूमिका चांगली रंगवली आहे. तडफदार व्यक्तिमत्त्वाचा स्वप्नाळू तरुण ते परिस्थितीने हतबल झालेला तरीही सर्वांशी झुंज देणारा युवराज त्याने ताकदीने साकारला आहे. शशांक शेंडे या अभिनेत्याच्या बाबतीत अधिक बोलणे न लगे. भूमिकेची उत्तम जाण, व्यक्तिरेखेचे अनेक अस्पर्शित पैलू ज्या सफाईदारपणे शेंडे यांनी दाखवले आहेत, त्याला तोड नाही. बाकीच्यांनीही भूमिका अगदी चोख साकारल्या आहेत. त्यात विशेष कौतुक करावं लागेल ते युवराजचे मित्र झालेल्या विठ्ठल काळे आणि महेश भोसले या दोन कलाकारांचं. यांच्या भूमिका तुलनेने दुय्यम वाटल्या तरी त्यात ते चांगलेच भाव खाऊन गेले आहेत. संगीताची बाजू ही उत्तम जमली आहे. छायांकन आणि इतर तांत्रिक बाजूही नेटक्या आहेत. दिग्दर्शक मकरंद माने यांनी कागरमधून यांनी दिग्दर्शक म्हणून कागर याला न्याय देण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे आणि तो बऱ्याच अंशी यशस्वीही झाला आहे.

वास्तवाच्या वणव्यात मानवी नात्यांची होणारी फरफट पुन्हा एकदा कागर अधोरेखित करतो. सत्तेसाठी केले जाणारे हेवे-दावे, शह-काटशहांचे खेळ कसे आपल्यातल्या भावनांचा बळी घेत जातात आणि माणूस असहाय्यपणे त्याचा स्वीकार करत जातो. पण, तरीही त्यातून त्याची पुन्हा उमलून येण्याची वृत्ती सतत त्याच्यावर प्रभावी ठरते, हे कागर नव्याने दाखवून देतो.

आपली प्रतिक्रिया द्या