जाणिवेचा अलगद वेध – मन उधाण वारा

1954

>> वैष्णवी कानविंदे- पिंगे

सुरळीत सुरू असणाऱ्या आखीव रेखीव आयुष्यात अचानक काही घटना घडते एखादा भयंकर अपघात होतो. न भरून येणारी जखम होते आणि आयुष्य अचानक थांबलंय असं वाटू लागतं. पण ते थांबलेलं नसतं. गरज असते ती आपला दृष्टिकोन बदलायची… आयुष्याकडे कसं पाहावं हे आपणच ठरवू शकतो आणि आपलं मनच आपल्याला खंबीरपणा देऊ शकतं किंवा खचवूदेखील शकतं.

नुकताच प्रदर्शित झालेला ‘मन उधाण वारा’ हा सिनेमा याविषयीच भाष्य करतो. घडणाऱ्या घटनांचा परामर्श घेऊन एका वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद म्हटला पाहिजे. अर्थात सिनेमा म्हणून साकारताना त्याच्या जडणघडणीमध्ये काही गोष्टी जमून न आल्याने या सिनेमाची पकड हवी तशी बसत नाही.

उत्तम नर्स असणाऱ्या आणि रुग्णसेवेत स्वतःला झोकून देणाऱ्या एका तरुणीवर एका रात्री अचानक सामूहिक बलात्कार होतो. या प्रसंगानंतर वर्ष उलटलं तरीही ती सावरू शकत नाही. उलट आयुष्य संपवायचे विचार तिच्या मनात घोळू लागतात. तिच्या अपराध्यांना कोर्टाकडून जन्मठेपेची शिक्षा होऊनदेखील तिला त्या प्रसंगाच्या दडपणातून बाहेर पडणं अशक्य होतं. त्यामुळे कोकणात राहणारे तिचे काका तिला काही दिवस हवापालटासाठी ये असं सुचवतात. आणि त्याप्रमाणे काकांकडे जाते. तिच्या खांद्यावर असणारं ओझं घेऊन वावरत असताना अचानक दुःख म्हणजे काय आणि किती असू शकतं आणि सगळ्या गोष्टीविरोधात असतानाही तसे मार्ग निघू शकतात आणि तसा आनंद होऊ शकतो याची जाणीव व्हायला लागते… पण खरोखरच गेला आनंद सापडतो का? जीवनाची नस परत सापडू शकते का? आणि जेव्हा ती त्या तात्पुरता बदल देणाऱ्या वातावरणातून निघून आपल्या विश्वात येते तेव्हा काय होतं हे सांगायचा प्रयत्न करणारा हा सिनेमा.

खरंतर या सिनेमाचा विषय उत्तम आहे त्याची मांडणी चांगली आहे, पण सिनेमात जिवंतपणा असला तरीही त्यात प्रेक्षकांना बांधून ठेवणारे एक धागा गरजेचा असतो आणि तोच कुठेतरी सुटलाय असं वाटत राहतं.

या सिनेमाची पटकथा आणि संवाद हे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या जोडगोळीने लिहिले आहेत. नामावलीत त्यांचं नाव वाचतानाच सिनेमाबद्दल एक आश्वासन मिळतं. आणि त्यांच्या सिनेमाच्या पद्धतीचा अनुभव ‘मन उधाण वारा’ पाहताना येतो. दशावतारात सांगितलेली अहिल्लेची गोष्ट त्या पार्श्वभूमीवर सरिताच्या मनात उमटणारे पडसाद. नंतर अचानक आलेले वादळ. आणि त्यात मिळणारा मदतीचा हात असे काही प्रसंग खूप प्रभावशाली उभे राहिले आहेत. पृथ्वीचे वैद्यचं गाणं आणि त्यानंतर तिचं खळखळून हसणं. बोटीमधला आजी सोबतचा छोटा प्रसंग. अंध भाऊ काकांच्या सोबत गाव बघण्याचा प्रसंग. गावातल्या प्रेमीयुगुलाचे काही संवाद किंवा गावचा बाजार अशा अनेक छोटय़ा-मोठय़ा प्रसंगातील वातावरणाचे खूप सुंदर निर्मिती झाली आहे आणि प्रसंग नक्कीच प्रभाव पाडतात. पण तरीही सगळं पहात असतानाच सिनेमा पुढच्या क्षणी कसं वळण घेणार आहे, शेवटी काय होणार हे स्पष्ट कळायला लागतं आणि मग सिनेमातील रस कमी होत जातो.

रित्विज वैद्य आणि मोनल गज्जर यांचा अभिनय चांगला आहे. त्या दोघांमधला ताजेपणा सुखद आहे. किशोर कदम, शर्वरी लोहकरे आदी कलाकारांचा अभिनयदेखील उत्तम झालाय. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो डॉक्टर शरद भुताडिया आणि सागर कारंडेचा. अपंगत्व आणि आयुष्य जगण्याचं समीकरण या दोघांचा व्यक्तिरेखांमधून छान उभे राहिले आहे.

दिग्दर्शन वास्तववादी आहे, पण मध्यंतरानंतर त्यात तोच तोच पणा यायला लागतो. आणि मग सिनेमा थोडा कंटाळवाणा व्हायला लागतो. छायांकन मात्र अप्रतिम. कोकणचा जिवंत, रसरशीत अनुभव हा सिनेमा पाहताना वाटय़ाला येतो. म्हणजे सिनेमाचा विषय एका बाजूला आणि कोकणचा अत्यंत विहंगम अनुभव दुसऱ्या बाजूला. कोकणच्या सौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी हा सिनेमा पाहावा इतकं सुंदर ते चित्रित केले गेले आहे.

जाणीवपूर्वक उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा. प्रसंगातून जाणारे आयुष्याचे मर्म. हे सगळं सिनेमा पाहताना नक्कीच जाणवतं, पण तरीही सिनेमा म्हणून पकड खूपच ढिली आहे याची जाणीवदेखील सिनेमा पुढे सरकतो तशी होत राहते.

एका विषयाच्या हाताळण्यासाठी, चांगल्या अभिनयासाठी आणि उत्तम छायांकनासाठी सिनेमा एकदा पाहायला हरकत नाही.

  • सिनेमा    मन उधाण वारा
  • दर्जा       ***
  • निर्माते    निशांत कौशिक, अक्षय गडा, धवल गडा
  • दिग्दर्शक संजय मेमाणे
  • कथा        प्रदीप कुरबा
  • पटकथा-संवाद     सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर
  • छायांकन मिलिंद जोग
  • कलाकार मोनल गज्जर, रित्विज वैद्य, किशोर कदम, शर्वरी लोहकरे, सागर कारंडे, डॉ. शरद भुताडिया, विनोद कुलकर्णी, भारती पाटील, ज्युलिया मोने, उत्तरा बावकर
आपली प्रतिक्रिया द्या