
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
समांतर पाणीपुरवठा राबविण्यासाठी सिटी वॉटर युटीलिटी कंपनी व प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावावर सभागृहात सविस्तर चर्चा झाली. नगरसेवकांनी मांडलेल्या सूचना व दुरुस्त्या विचारात घेऊन प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात येत असल्याचा निर्णय महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज मंगळवारी सभागृहात जाहीर केला. तसेच योजना राबविण्यासाठी ठरावातील सर्व मुद्यांवर निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आयुक्तांना देण्यात येत असल्याचे सांगितले.
समांतर पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सिटी वॉटर युटिलिटी कंपनी आणि प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावावर २७ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी चर्चा करून सूचना व दुरुस्त्या सुचविल्या होत्या. परंतु महापौर नंदकुमार घोडेले यांनी सभेत निर्णय राखून ठेवत सरकारकडून हमीपत्र आणण्याची शिफारस करून आठ दिवसांत दिवसात निर्णय जाहीर करण्यासाठी सभा बोलावण्यात येईल, असे सांगितले.
त्यानंतर सभा तहकूब केली होती. तहकूब सभा मंगळवारी बोलावण्यात आली. सकाळी ११.३० वाजता महापौर नंदकुमार घोडेले यांनी सभेचे कामकाज सुरू केले. समांतर योजना राबविण्यासाठी कंपनी व प्रशासनाकडून दाखल केलेल्या प्रस्तावावर निर्णय देताना महापौर घोडेले म्हणाले, सिटी वॉटर युटीलिटी कंपनीने नियोजनबद्ध व कालबद्ध मर्यादेत काम न केल्याने मनपाने कंपनीवर अकार्यक्षमतेचा व कंपनीने त्यांचा निधी न वापरल्याने आर्थिक नियोजनाचा अभाव असल्याचा ठपका ठेवून करारनामा १ ऑक्टोबर २०१६ रोजी रद्द केला आहे. शहराची लोकसंख्या सुमारे १५ लाख असून आज रोजी पाणीपुरवठ्याची व्यवस्था बिकट झालेली आहे. सद्य:स्थितीत शहरात तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. यासाठी जनहित व सभागृहातील सर्व नगरसेवकांच्या भावना लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजनेचे पुनरूज्जीवन करण्याचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर ठेवला. जो करारनामा सर्वसाधारण सभेने ३० जून २०१६ रोजी रद्द केला होता. त्याचासुद्धा अभ्यास केला आहे. या प्रकल्पाचे पुनरूज्जीवन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरिंन्सगव्दारे चर्चेत प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करून शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.
प्रस्तावातील अटी व शर्ती
• समांतर प्रकल्पाचे सुधारित अंदाजपत्रक तयार करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यता घेण्यात यावी. ३० महिन्यांत योजनेचे काम कंपनीने पूर्ण करावे.
• जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत प्रथम प्राधान्याने मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम तात्काळ सुरू करून नक्षत्रवाडी संतुलित जलकुंभापर्यंत पाणी आणण्याचे नियोजन करावे. त्यासोबतच शहरात आवश्यक त्या ठिकाणी जलकुंभ बांधणे, जलकुंभासाठी आवश्यक मुख्य ट्रान्समिशन मेन्स टाकणे ही अनुषांगिक कामे सुरू करावीत
• महानगरपालिका व कंपनी यांच्या वतीने सविस्तर शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करावे. या अटीवर प्रस्तावातील मुद्दा क्र. एक मान्य करण्यात येतो. सुधारित पहिल्या माईलस्टोनला आवश्यक परवानगी मिळाल्यावर काम सुरू झाल्याचा दिनांक समजण्यात यावा. प्रत्येक माईलस्टोनपूर्वी संबंधित माईलस्टोनला आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्याची जबाबदारी कंपनीची राहील.
• प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनी आवश्यक निधी कशा रितीने उभा करेल, याचा तपशील मनपाला देणे बंधनकारक राहील. तसेच प्रकल्प पूर्णत्वासाठी कुठलीही वित्तीय तूट भासणार नाही, याची खात्री पटविण्याची जबाबदारी वंâपनीवर राहील.
• प्रकल्पाला लागणारे वित्तीय साह्य वित्तीय संस्थाकडून उभारण्याची सर्वस्वी जबाबदारी कंपनीची असल्यामुळे त्यापोटी परतफेडीसाठी मनपा जबाबदार राहणार नाही. तसेच मनपाची कोणतीही मालमत्ता वित्तीय संस्थांकडे गहाण ठेवता येणार नाही.
• कंपनीने भाववाढ रक्कम ७९ कोटी रुपये मिळणेबाबत प्रस्तावात मागणी केली आहे. मूळ प्रकल्प किमतीत प्रचलित बाजारभावामुळे झालेल्या दरवाढीस मनपा जबाबदार नाही. तथापि, प्रकल्प पूर्ण होऊन शहरास पाणी मिळणे आवश्यक असल्याने यासंदर्भात सरकार स्तरावर निर्णय घेऊन आवश्यक ती मदत करावी. तशी विनंती मनपाच्या माध्यमातून या ठरावान्वये सरकारला केली जाईल.
• अतिरिक्त कामांसाठी लागणारा ११५ कोटी रुपयांचा निधी अनुदान स्वरूपात मिळण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवून मागणी केली जाईल. सरकार स्तरावर मागणी मान्य झाल्यानंतरच नवीन कामे हाती घेण्यात यावीत, या अटीवर हा मुद्दा मान्य करण्यात येतो.
• कंपनीला भराव्या लागणाऱ्या जीएसटी करापोटी ९५ कोटी नियमानुसार देय असेल तर मनपाची आर्थिक स्थिती पाहता त्यासाठीच्या रकमेची मागणी सरकारकडून अनुदान स्वरूपात करण्यात यावी किंवा जीएसटी कराची रक्कम माफ करण्यासाठी सरकारला मनपामार्फत विनंती करावी.
• प्रकल्प उभारणीसाठी लागणाऱ्या साहित्यामधील बदल करण्यासंदर्भात परवानगी देता येणार नाही. आर्थिक व कायदेशीर बाबतीत सरकारचे मार्गदर्शन घेण्यात यावे. जलवाहिनीसाठी निविदामध्ये जे. डी. आय. पाईप टाकावयाचे आहेत, त्याचाच वापर करण्यात यावा.
• मनपामार्फत यापूर्वी कंपनीकडून झालेल्या कामाचे तांत्रिक व आर्थिक हिशोब अंतिम करण्यात यावे. कंपनीने रुपये ७९.२२ कोर्टांची अधिक नियमानुसार आवश्यक त्या रकमेची राष्ट्रीयीकृत बँकेची बँक गॅरंटी सुरक्षा अनामत म्हणून देणे बंधनकारक राहील.
पाणीपट्टीचे दर कायम
• कंपनीने चार वर्षापर्यंत म्हणजे ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पाणीपट्टीचे दर कायम ठेवण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यानुसार प्रकल्प पूर्ण झाल्याच्या तारखेपासून पुढील दीड वर्षापर्यंत प्रचलित पाणीपट्टीचे दर कायम ठेवण्यात येतील. पाणीपट्टीचे १ सप्टेंबर २०१४ पासूनचे अभिलेखे व त्यासंदर्भाच्या सॉफ्टवेअरमध्ये विहित सुधारणा करून मनपाच्या वसुलीसाठी सव्र्हरला जोडणे बंधनकारक राहील. पाणीपट्टीसंदर्भाने जनहित लक्षात घेता ३० सप्टेंबर २०२२ नंतरचे पाणीपट्टीचे दर कमी करण्याबाबतचा निर्णय कंपनीच्या सहमतीने योजनेचे काम सुरू झाल्यानंतर घेण्यात येईल.
• पुनरुज्जीवनांतर्गत होणारा तडजोड करारनामा सध्या सुरू असलेल्या आर्बिट्रेशन लवादासमोर ठेवून निवाडा म्हणून त्यावर शिक्कामोर्तब करून घेणे तसेच प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे संपुष्टात आणणे बंधनकारक राहील. कंपनीच्या भागीदारीत बदल करून मुख्य भागीदार बदलण्याच्या संदर्भाने त्या विषयातील तज्ज्ञ व कायदेविषयक सल्लागाराचा सल्ला घेऊन प्रशासनाने निर्णय घ्यावा.
• मनपाचे व जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून करारनाम्यातील दुरुस्ती करण्यात यावी. मूळ करारनाम्यात कुठल्याही प्रकारचा बदल न करता दोघांच्या म्हणजे मनपा व कंपनीच्या संमतीने कायदेशीर बाबी तपासून निर्णय प्रशासनाने घ्यावा. त्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात येतात. प्रकरण न्याय प्रविष्ट होऊ नये, याची काळजी घेऊन सदर दुरुस्तीला सक्षम प्रशासकीय मान्यतेनंतर राज्य सरकारची परवानगी घेण्यात यावी. त्यानुसार कार्यवाही करावी व केलेल्या दुरुस्तीची माहिती सक्षम सभागृहास देण्यात यावी.
• मनपाला लागणारा अधिकचा निधी एकूण रुपये २८९ कोटी हे शंभर टक्के अनुदान रूपाने सरकारकडून प्राप्त होण्याच्या आधीन राहून व मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरस बैठकीच्या आधिन राहून या ठरावाची प्रशासनाने अंमलबजावणी करावी.
• ही योजना पूर्ण करताना मनपाला केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेल्या अनुदान १६१.८० कोटी रकमेवर आजपर्यंत १२५ कोटी रुपयांचे व्याज मिळालेले आहे. या व्याजाच्या रकमेचा विनियोग सरकारच्या परवानगीने याच प्रकल्पावर मनपाचा हिस्सा म्हणून करण्यात यावा. तसेच आयुक्तांनी हा ठराव पुढील कार्यवाहीसाठी तात्काळ सरकारकडे पाठवावा. हा प्रस्ताव दुरुस्तीसह मंजूर करण्यात येतो.
































































