
सामना ऑनलाईन । मुंबई
काही दिवसांपूर्वी शहाड रेल्वे स्थानकाच्या फलाटावर रिक्षा चालवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा विरार स्थानकात असाच प्रकार घडला आहे. एका रिक्षाचालकाने थेट फलाटावरच रिक्षा चालवल्याने त्याला अटक झाली आहे. मात्र, या मागे त्याचा स्टंट करण्याचा हेतू नसून त्याने एका गर्भवती महिलेची मदत करण्यासाठी असं केल्याचं उघड झालं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सागर गावड असं या रिक्षाचालकाचं नाव आहे. सागर विरारचाच रहिवासी असून त्या परिसरात रिक्षा चालवतो. रविवारी मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या अनेक गाड्या स्थानकांमध्येच अडकून पडल्या होत्या. विरार स्थानकात थांबलेल्या एका रेल्वेत सात महिन्यांच्या गर्भवती महिलेला अचानक प्रसुतीकळा सुरू झाल्या. तिच्या पतीने स्टेशनबाहेर धाव घेत रिक्षास्टँड गाठलं. तिथे रिक्षा घेऊन गिऱ्हाईकाची वाट बघणाऱ्या सागरशी त्याची गाठ पडली. त्याने सागरकडे मदतीची याचना केली. सागरने क्षणाचा विलंब न लावता रिक्षा फलाटावर आणली आणि दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यातून महिलेला रिक्षात बसवलं. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथे तिने एका मुलीला जन्म दिला. हा प्रकार स्थानकाच्या सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाला.
माणुसकीच्या नात्याने सागरने या दांपत्याकडून रिक्षाचं भाडंही नाकारलं. एका गरजू जोडप्याला मदत केल्याच्या आनंदात असणाऱ्या सागरला दुसऱ्या दिवशी अटक होणार असल्याचं कळल्यावर धक्का बसला. रेल्वे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सागर गेली अनेक वर्षं रिक्षा चालवतो. जरी त्याने ही कृती माणुसकीपायी केली असली तरी त्यामुळे इतर प्रवाशांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला. त्यामुळे त्याला यासाठी अटक करावी लागली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सुदैवाने सागरला जामीन मिळाला आहे.



























































