
सातारा येथील करंजे पेठेतील रिक्षाचालकास ‘अनैतिक संबंधांची माहिती तुझ्या पत्नीला देईन,’ अशी धमकी देत त्याच्याकडून लाखो रुपये लुबाडल्यानंतरही पैशांसाठी ब्लॅकमेलिंग सुरूच ठेवल्याने त्याला कंटाळून रिक्षाचालकाने आत्महत्या केली. आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
रिक्षाचालकाची पत्नी वैशाली विजय ननावरे (वय 36, रा. करंजेपेठ, सातारा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारदार वैशाली ननावरे यांचे पती विजय ननावरे हे रिक्षाचालक होते व गजरे विक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यांचे शेखर आंग्रे (रा. खारी विहिरीजवळ, सातारा), केटरिंगचे काम करणारा राजू पोतनीस (रा. करंजे) व आणखी एका महिलेसोबत जवळचे संबंध होते. त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणेदेखील होते. 4 सप्टेंबर रोजी विजय ननावरे यांनी पत्नी वैशालीला फोन करून ‘राजू, शेखर व संबंधितांकडून मला त्रास होत आहे. ब्लॅकमेलिंग करून लुटले असून, मला सहन होत नाही. मुलांकडे लक्ष दे,’ असे म्हणून फोन ठेवला. तसेच विजय यांनी पत्नीला मेसेजही पाठविला.
ही बाब वैशाली ननावरे यांनी दीर रमेश ननावरे यांना सांगितल्यावर त्यांनी फोन लावला; पण विजय ननावरे यांनी फोन उचलला नाही. शोध घेण्यास सुरुवात केल्यानंतर विजय हॉटेल ‘सुरुबन’कडे गेला असल्याचे समजले. त्यावेळी तेथे राजू पोतनीस, शेखर आंग्रे व संबंधित महिला उपस्थित होते. त्यांना विचारले असता, त्यांनी विजय याने गळफास घेतल्याचे सांगितले. दरम्यान, पतीच्या निधनामुळे तक्रारदार वैशाली ननावरे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संशयित तिघांनी पतीला वेळोवेळी ब्लॅकमेलिंग करून लुटले असून, त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक संजय पतंगे अधिक तपास करीत आहेत.






























































